घरपालघरलोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीची मोर्चेबांधणी

लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीची मोर्चेबांधणी

Subscribe

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत बविआने महायुतीला मदत केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बविआची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

शशी करपे/ वसईः महाविकास आघाडी आणि महायुतीत पालघर लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून अद्याप एकमत होत नसतानाच आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बविआच्या बैठकांचा सिलसिला सुरु असून त्यातून कार्यकर्ते उमेदवार उभा करण्यासाठी दबाव टाकत असल्याने यंदाही बविआचा उमेदवार मैदानात असेल असे जवळपास निश्चित मानले जात आहे. याबाबत बविआचे संघटक सचिव अजीव पाटील यांनीही उमेदवार असेल असे संकेत दिल्याने पालघरमध्ये याहीवेळी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बळीराम जाधव पराभूत झाले असले तरी त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी चांगली होती. पालघऱ जिल्ह्यातील सहापैकी तीन आमदार असलेली बहुजन विकास आघाडी महायुतीत सहभागी आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत बविआने महायुतीला मदत केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बविआची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. त्यातही महायुतीचा उमेदवार कोण असेल हेही गुलदस्त्यात आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले असले तरी त्याआधी झालेल्या पोटनिवडणुकीत ते भाजपचे उमेदवार आहेत. यावेळी शिंदे गटात असलेले गावीतच उमेदवार असतील असे निश्चित मानले जाते. पण, भाजपनेही या जागेवर दावा कायम ठेवत गावितांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध आहे. हा तिढा कायम असतानाच बबिआने लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बविआचे कार्यकर्ते मेळावे सुरु झाले आहेत. यात कार्यकर्त्यांकडून यंदा निवडणूक लढवावी, यासाठी हितेंद्र ठाकूरांना आग्रह केला जात आहे. आमदार ठाकूरांनी आपल्या नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे निवडणुकीसंबंधी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. पालघर लोकसभा मतदारसंघात वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात १२ लाख ३२ हजार ७४ मतदार आहेत. तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात ८ लाख ५७ हजार ६३६ मतदार आहेत. वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघात बविआचे उमेदवार आहेत. तसेच निर्णायक ठरणार्‍या वसई -विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकुरांचेच वर्चस्व आहे. तर मतदार संघात राष्ट्रवादी (शरद पवार गट) एक, माकपचा एक आणि शिंदे गटाचा एकमेव आमदार आहे. परिणामी ठाकूरांचे वर्चस्व पाहता त्यांनी उमेदवार दिला तर तिरंगी लढत निश्चितपणे होणार आहे. बविआचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देताना त्याबाबतचा निर्णय आमदार हितेंद्र ठाकूर आणि बविआची कोअर कमिटी घेईल, असेही सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -