घरपालघरशवपेटीत पानवेलीची पाने जरूर ठेवा

शवपेटीत पानवेलीची पाने जरूर ठेवा

Subscribe

या आजारपणाच्या काळात स्तेलाबाईंनी आपल्या मुलाजवळ आपली शेवटची इच्छा वारंवार बोलून ठेवली होती.

वसई : मी मरण पावल्यावर माझ्या शवपेटीत फुले नसली तरी चालतील, पण पानवेलीची पाने जरूर ठेवा, अशी मरणशय्येवर असलेल्या मातेने आपली शेवटची इच्छा मुलाकडे व्यक्त केली होती आणि ती तिच्या मुलाने व सुनेने गिरीज चर्चकडे निघताना आठवणीने पूर्ण केली.वसईतील गिरीज येथील सातोडी गावातील स्तेला निकलस करवालो (84 वर्षे) यांचे मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. या आजारपणाच्या काळात स्तेलाबाईंनी आपल्या मुलाजवळ आपली शेवटची इच्छा वारंवार बोलून ठेवली होती.

गिरीज येथील निकलस करवालो पिढीजात शेतकरी. त्यांचे पानवेलीचे मळेही होते. या पानवेलीची पाने मजुरांसोबत काढून ही पाने टोपलीत घालून पहाटे वसईतील होळी येथील बाजारात घेऊन जाणे आणि ती विकणे हे काम त्यांची पत्नी स्तेलाबाई वर्षानुवर्षे करीत आल्या. ही पाने रोज दुपारी वेलीवरून काढल्यावर ती संध्याकाळी उशिरापर्यंत योग्य पद्धतीने बांधून ठेवण्याचे कामही स्तेलाबाई अनेक वर्षे करीत आल्या. पानवेलीच्या मळ्यात काम करणे, पाने काढून पहाटे विक्रीस घेऊन जाणे हा स्तेलाबाईचा जीवनाचा भाग एकेकाळी बनला होता. रात्रंदिवस शेतीवाडीत कष्ट उपसणार्‍या स्तेलाबाईंना मधुमेहाचा विकार जडला व पुढे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने आठवड्याला दोन दिवस डायलेसीस करणे भाग पडू लागले. या विकाराने स्तेलाबाईंचे प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली व मंगळवारी तिचे निधन झाले. आजारपणात त्या आपले ‘पानवेलीचे दिवस’ विसरू शकल्या नाहीत. त्यांनी आपल्या शवपेटीत फुले नसली तरी चालतील पण पानवेलीची पाने ठेवा, असे मुलाला निक्षून सांगून ठेवले होते. मंगळवारी त्यांचे निधन झाल्यावर गिरीज चर्च अंत्ययात्रा निघाली तेव्हा तिचा मुलगा अनिल आणि सून अर्सेला यांनी पानवेलीची पाने शवपेटीत ठेवली तेव्हा कुटुंबियांना हुंदका आवरला नाही. स्तेला करवालो यांच्या मागे पती, दोन मुलगे आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -