जव्हार शहरात डुकरांचा बालकावर हल्ला; जखमी बालकावर उपचार 

दर दहा ते पंधरा दिवसांनी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे जावून समस्यांचा पाढा वाचतात, मात्र सुधारणा होत नसल्याची बाब पुढे येत आहे.

जव्हार : शहरात मोकाट डुकरांची समस्या देखील वाढली आहे. डुकरांमुळे दुर्गंधी देखील वाढत चालली आहे. मागील काही महिन्यापासून शहरात मोकाट डुकरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे हे डुक्कर नागरिकांवर हल्ला करीत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात ठिकठिकाणी डुकरांचे कळप दिसत आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अन्यथा या विरोधात नगर परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.नगर परिषदेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपून काही महिने झाले आहेत. पालिकेची निवडणूक लागली नसल्याने येथे प्रशासकराज आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी सैल झाले आहेत. शहरातील समस्या आवासून उभ्या आहेत. दर दहा ते पंधरा दिवसांनी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे जावून समस्यांचा पाढा वाचतात, मात्र सुधारणा होत नसल्याची बाब पुढे येत आहे.

नगर परिषद परिसरात मोकाट डुकरे वाढली असल्याची माहिती मिळाली असून त्यावर उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशाल मोरे,स्वच्छता विभाग,जव्हार नगर परिषद