दशावतार लोककला अद्यापही टिकून; खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन

'दशावतारासह इतर कोकणी लोककलांतील कलावंत घडवण्याचे काम आमचा दर्दी प्रेक्षक करत असतो. म्हणून हजार वर्षानंतरही दशावतारासारखी लोककला अद्यापही कोकणात टिकून आहे, बहरत आहे.

‘दशावतारासह इतर कोकणी लोककलांतील कलावंत घडवण्याचे काम आमचा दर्दी प्रेक्षक करत असतो. म्हणून हजार वर्षानंतरही दशावतारासारखी लोककला अद्यापही कोकणात टिकून आहे, बहरत आहे. यापुढे देशाच्या राजधानीत दिल्लीत दरवर्षी दशावताराचे प्रयोग व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी वसईत बोलताना केले. डॉ. अशोक भाईडकर यांनी लिहिलेल्या आणि डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दशावतार’ या शोधपर ग्रंथाचे विमोचन खासदार राऊत यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर होते. व्यासपीठावर खासदार राजेंद्र गावित, कवी प्रा. अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, लोककलावंत बाबा मेस्त्री, संदेश जाधव, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे व प्रा. सुधाकर वळंजु उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक भाईडकर यांच्या उषास्वप्न, भगतसिंग आणि आवस या पुस्तकांचेही विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की, दशावतारावर संशोधन करणारे हे पहिलेच पुस्तक आहे. डॉ. अशोक भाईडकर यांच्या या पुस्तकाने कोकणातील लोककलेला महान करण्याचे काम केले आहे. यापूर्वी नाटककार गंगाराम गवाणकरांनी मालवणी भाषा अवगत करून ती वस्त्रहरणच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेली आहे. तथापि, कोकणातल्या दशावतार या लोककलेला पारंपरिक स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहा तालुक्यांत दशावताराचे प्रयोग केले जातात. हे दशावतारी लोककलावंत अक्षरश: दशावतार जगत असतात. म्हणून ते पौराणिक व्यक्तिरेखा हुबेहूब साकार करतात, असेही राऊत यावेळी म्हणाले.
गंगाराम गवाणकर यांनी मालवणी माणसांची विविध वैशिष्ट्ये आपल्या खुमासदार शैलीत वर्णन केली. त्याचबरोबर दशावतारावर ४० वर्षे संशोधन करणार्‍या डॉ. अशोक भाईडकर यांसारख्या व्यासंगी संशोधकाला पद्मश्रीसारख्या पुरस्काराने सन्मानित करून कोकणाचा आणि कोकणी लोककलेचा गौरव करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपण कामगार मंत्री असताना कोकणातील संगमेश्वर येथे ४५ दशावतारी मंडळांचे कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगून खासदार राजेंद्र गावित यांनी सांस्कृतिक मूल्य जपण्याचे काम दशावताराने केल्याचे गौरवोद्गार काढले. शासन कुणाचेही असू दे,  शासनाने कलाकारांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे, कारण ते सांस्कृतिक मूल्ये जपण्याचे कार्य करीत असतात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या राज्यातील लोकसंस्कृती वजा केली तर महाराष्ट्र कोरडा होईल. महाराष्ट्रातील हा सांस्कृतिक ओलावा जपण्याचे काम सामान्य लोक कलाकारांनी केले आहे. जेव्हा कलेवर आक्रमण होते, तेव्हा संस्कृतीचा र्‍हास होतो, हे मागील अडीच वर्षात आपण अनुभवले आहे. दशावतार हे फक्त मनोरंजन करणारे नाही तर ते प्रबोधन करणारे आहे. कारण त्यात खळांचे निर्दालन कसे होते, ते दाखवले जाते, असे कवी प्रा. अशोक बागवे यांनी सांगितले. त्यांनी दशावताराची फोड करून त्यातील काही बारकावेही दाखवले. तत्पूर्वी सतीश सोळांकूरकर आणि प्रा. सुधाकर वळंजु यांनी प्रकाशित झालेल्या चारही पुस्तकांचे अंतरंग थोडक्यात उलगडून दाखवले.
दशावतारावर यक्षगानाचा असलेला प्रभाव खोडून टाकून या कलेचा उदय आणि प्राचीनत्व अधोरेखित करण्यासाठी मी १९८५ साली संशोधन करून पीएचडी प्राप्त केली. दशावताराचा जन्म कोकणातच झाला आहे, आणि इंदौरमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई या दशावतराचा प्रयोग घडवून आणत असल्याचे डॉ. अशोक भाईडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा विचारे यांनी केले. प्रकाशन सोहळ्यानंतर ‘अग्निप्रवेश’ हे पारंपरिक दशावतारी नाटक सादर करण्यात आले.