घरपालघरअनधिकृत फटाके विकणाऱ्यांवर गुन्हे

अनधिकृत फटाके विकणाऱ्यांवर गुन्हे

Subscribe

पण, शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना, अनधिकृतपणे फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. मीरा- भाईंदर परिसरातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यात २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसई: मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात बेकायदेशिरपणे फटाके विकणार्‍या २७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करण्यात टाळाटाळ करत दुर्लक्ष केले गेले. तर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वसई- विरार परिसरात ५७ तर मीरा- भाईंदर परिसरात ३२ आगीच्या घटना घडल्या होत्या. मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात कोरोनानंतर यंदा उत्साहात दिवाळी साजरी केली गेली. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच फटाक्यांची आतषबाजी पहावयास मिळाली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर रात्रभर फटाके फुटत होते. तर यंदा फटाक्यांची दुकानेही अनेक ठिकाणी थाटली गेली होती. पोलीस प्रशासन आणि महापालिकांचे दिवाळीवर विशेष लक्ष असले तरी यंदा प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे टाळल्याचे दिसून आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याकडेला दुकाने टाकून फटाके विक्रीला बंदी होती. मोकळ्या मैदानातच फटाके विकण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यासाठी दिवाळीच्या काळात महावितरण, महापालिका,  अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्या परवानग्या घेणे बंधनकारक होते.  त्यानंतरच फटाके विक्रीचा परवाना दिला जात होता. याअटी शर्तीच्या अधिन राहून परवाना मिळवणे अशक्य असल्यानेच वसई- विरार महापालिका हद्दीत फक्त २०५ परवाने घेतले गेले होते. पण, शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना, अनधिकृतपणे फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. मीरा- भाईंदर परिसरातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील विविध पोलीस ठाण्यात २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी रात्री आठ ते १० ही वेळ दिली होती. पण, दिवाळीत न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वेळेपलिकडे फटाके फोडण्यात आले. पण, त्यावर दोन्ही महापालिका अथवा पोलीस प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. मीरा- भाईंदर महापालिकेने फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कनिष्ठ अभियंते, लिपिक आणि सुरक्षा रक्षकांची पथके तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही एकही गुन्हा अथवा दंडात्मक कारवाई झाली नसल्याचे दिसून आले आहे. मुंबई, नवी मुंबई महापालिकांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा भंग करणार्‍यांविरोधात कारवाई केली होती. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चारशेहून अधिक अदखलपात्र गुन्हे दाखल केले असताना मीरा भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकही गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फटाक्यांमुळे आगीच्या घटना
वसई- विरार परिसरात दिवाळीच्या दिवसात ५७ ठिकाणी तर मीरा- भाईंदर परिसरात ३२ ठिकाणी आगी लागल्या होत्या. वसई- विरार परिसरात सर्वाधिक ३२ घटना या फटाक्यांमुळे कचरा आणि सुक्या गवताला आग लागल्याने घडल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अनेक ठिकाणी सामानाचे नुकसान झाले आहे. यंदा फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. उंचावर जाऊन फुटणारे फटाके नारळाच्या झाडांवर जाऊन अडकल्याने ११ ठिकाणी नारळाच्या झाडांना आगी लागल्याची नोंद अग्निशमन विभागाकडे आहे. फटाक्यांमुळे भंगारसाहित्य, मंडप सजावटीचे सामान, चारचाकी, हातगाडी यांनाही आग लागल्याची नोंद आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -