कोरोना रोखण्यासाठी तहसिलदार श्रीधर गल्लीपिल्ले रस्त्यावर

कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी तलासरीचे तहसिलदार स्वतः रस्त्यावर उतरल होते.

कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी तलासरीचे तहसिलदार स्वतः रस्त्यावर उतरल होते. तहसिलदार श्रीधर गल्लीपिल्ले यांनी महसूल व नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह बाजारपेठेतील आस्थापने, सलून, मॉल, किराणा दुकाने इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावानुसार राज्यात पालघर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून कोरोना अधिनिमनाचे काटेकोर पालन न केल्यास रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी तहसिलदार गल्लीपिल्ले स्वतः रस्त्यावर उतरले होते. महसूल कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांसोबत लाऊड स्पीकरच्या साहाय्याने सामाजिक अंतर व चेहऱ्यावर मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना करत मास्क अथवा सामाजिक अंतर न राखल्यास उद्यापासून दंड आकारण्यात येऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गावपाड्यातून नागरिक खरेदीकरता बाजारपेठेत येत असतात. यामुळे नागरिकांमध्ये ओमायक्रोन व कोरोनाविषयी जनजागृती करता बाजारपेठेमध्ये जागोजागी लाऊड स्पीकर तहसीलदार यांच्या आदेशाने लावण्यात आले असून स्पीकरद्वारे सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे तालुक्यातील खासगी दवाखाने, रुग्णालय इत्यादी ठिकाणी तहसीलदार गल्लीपिल्ले व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत अँटिजेन टेस्ट किटचे वाटप करण्यात आले. खासगी डॉक्टरांना येणाऱ्या रुग्णाचा अँटिजेन टेस्ट करून पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती आरोग्य विभागास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांवर नाराजी

नगरपंचायत हद्दीतील आठवडी बाजार असल्याने तोबा गर्दी होती. अशावेळी तहसिलदारांनी आठवडी बाजारात फेरीवाल्यांना मास्क वापरणे अनिवार्य असून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तलासरी तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नियमांची अमलबाजवणी करता रस्त्यावर उतरले असताना पोलीस प्रशासनाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची सहाय्यता मिळाली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तहसीलदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोविड व ओमायक्रोन विषयी जनजागृती करताना सोबत पोलीस असावे, यासाठी तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवरकर यांची भेट घेतली होती. परंतु शिवरकर यांनी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे आम्ही तुमच्यासोबत पोलीस पाठवू शकत नाही, असे उत्तर तहसीलदार श्रीधर गलीपल्ली यांना दिल्यामुळे तहसीलदार यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत)

हेही वाचा – 

Omicron Variant: ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये दिसली धोकादायक