चारोटी चौरेपाडा ते गावदेवी मंदिर रस्ता निकृष्ट; ठेकेदारावर कारवाईची मागणी

डहाणू तालुक्यातील चारोटी ग्रामपंचायत अंतर्गत चौरेपाडा ते गावदेवी मंदिरादरम्यान आमदार स्थानिक विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आला होता.

डहाणू तालुक्यातील चारोटी ग्रामपंचायत अंतर्गत चौरेपाडा ते गावदेवी मंदिरादरम्यान आमदार स्थानिक विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थ करत असून ठेकेदाराने मनमानी कारभार करत अंदाजपत्रकानुसार काम न करता तकलादू पद्धतीने काम पूर्ण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून खडकाळ रस्त्यावरून प्रवास करत होते. दरम्यान, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता मंजूर झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत होता. परंतु संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या आनंदावर विरजण घालत नागरिकांच्या पदरी निकृष्ट दर्जाचा रस्ता टाकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच रस्ता हा येत्या पावसाळ्यातच वाहून जातो की काय, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रस्ता होण्याची वाट पाहत होतो. आता रस्ता मंजूर तर झाला आहे. परंतु रस्त्याचे काम अगदीच निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूवरून खडी व डांबर निघून पडत आहे. त्यामुळेच हा रस्ता पुन्हा करून द्यावा. अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
– जयेश धानमेहेर, ग्रामस्थ, चारोटी
रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षापट्टी न घातल्यामुळे रस्ता लवकरच खराब होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी मिळून संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यावर अजूनही काही उत्तर आलेले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच रस्त्याची अवस्था बिकट असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच हा रस्ता पुन्हा एकदा बनवून देण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.रस्ता हा निविदेप्रमाणेच झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. रस्त्याचा कालावधी हा तीन वर्षांचा असून दरम्यान मधल्या काळात जर खराब झाला तर तो ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्त करून घेण्यात येईल. ग्रामस्थांच्या पत्रव्यवहाराला वरिष्ठ उत्तर देतील.
– ज्योतींद्र पारेख, ज्युनिअर इंजिनिअर, बांधकाम विभाग, डहाणू