घरपालघरUttan Dumping News: उत्तन रहिवाशांची डम्पिंगची समस्या सुटेना

Uttan Dumping News: उत्तन रहिवाशांची डम्पिंगची समस्या सुटेना

Subscribe

उत्तन येथील डम्पिंगला गेल्या काही महिन्यात अनेक वेळा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीच्या धुरामुळे व अगोदरच परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

भाईंदर :- मीरा – भाईंदर शहरातील दैनंदिन निघणारा कचरा भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे टाकला जात आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे त्या परिसरातील नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यांना गेल्या १४ वर्षांपासून मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. परंतु त्याला यश आले नाही. आता पुन्हा नागरिकांना आक्रमक पवित्रा घेतला असून डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिक आक्रमक झाल्यामुळे महापालिका आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते. परंतु या बैठकीत देखील महापालिका प्रशासनाकडून फक्त आश्वासन देण्यात आले. यावेळी उत्तन डम्पिंग येथे जाणारा कचरा टप्प्याटप्याने कमी करण्यात येईल, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे, असे आश्वासन आयुक्तांनी ग्रामस्थांना दिले आहे. यापूर्वी देखील तत्कालीन आयुक्तांनी अशीच आश्वासने दिली होती. ती अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही आता पुन्हा आश्वासन मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तन येथील डम्पिंगला गेल्या काही महिन्यात अनेक वेळा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीच्या धुरामुळे व अगोदरच परिसरात दुर्गंधीयुक्त वास येत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

या बैठकीमध्ये उत्तनच्या डम्पिंगमध्ये कचर्‍याच्या गाड्या पाठवू नयेत, अगोदर आहे तो कचरा पूर्ण खाली करा, दुसर्‍या ठिकाणी डम्पिंग हलवा अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. गेल्या १४ वर्षापासून आम्ही नरक यातना भोगत आहोत, आमचे जीवन जगणे कठीण झाले आहे, एवढ्या वर्षात डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडवण्यात प्रशासन अयशस्वी झाले आहे. या डम्पिंगच्या नावाखाली महापालिका ठेकेदाराला पोसत आहे, हा निधी ठेकेदारासाठीच खर्च करत आहे असा ग्रामस्थांनी आरोप केला. यावेळी उत्तन मधील ग्रामस्थांनी शहरात गोळा होणार कचरा आता उत्तनमध्ये न नेता त्याच्यावर शहरातच प्रक्रिया करण्यात यावी, कचरा टाकण्यासाठी शहरातील अन्य जागांची निवड करावी, कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महापालिकेने याआधी आश्वासन दिलेले दहा प्रकल्प तातडीने सुरू करावेत, आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यावेळी आयुक्त संजय काटकर यांनी उत्तनला जाणारा कचरा एकदम बंद करणे शक्य नाही, परंतु या डम्पिंग ग्राऊंडवर जाणारा कचरा टप्प्याटप्प्याने कमी केला जाईल यासाठी प्रशासनाने सर्व नियोजन सुरू केले आहे.

- Advertisement -

त्यानुसार शहरात दररोज निर्माण होणारा नारळाचा ६० टन कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जाणार असून त्यापासून कोकोपीट तयार केले जाईल. तो प्रकल्प गोल्डन नेस्ट येथे सुरू केला आहे. हळूहळू त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक कारखान्यातून तयार होणारा बफिंगचा कचरा स्वतंत्र गोळा करून त्याची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावली जाईल. शहरातील सुमारे ३८२ हॉटेल व ७१ मिठाईची दुकाने यातून निर्माण होणारा ७० टन कचरा, चिकनपासून तयार होणारा ४० टन कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्याची शहरातच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच सध्या डम्पिंग ग्राऊंडवर असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवली जाणार आहे, अशा पद्धतीने दैनंदिन गोळा होणार्‍या साडेचारशे टनापैकी साडेतीनशे टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर जाणार नाही, याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी काही महिने वेळ लागेल तरी आपण माझ्यावर विश्वास ठेवा असे आयुक्तांनी आश्वासन दिले. या बैठकीला स्थानिक आमदार गीता जैन, माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा, फादर ऑस्कर मेन्डोन्सा, मच्छीमार नेते लिओ कोलासो, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो, जॉर्जी गोविंद, शर्मिला गंडोली आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -