घरपालघरभवानगडावर स्वच्छतेची विजयादशमी

भवानगडावर स्वच्छतेची विजयादशमी

Subscribe

पूर्वी पावसाळा संपल्यावर गडदुर्गांवर गवताची सफाई करुन किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष करण्याची परंपरा होती. कालांतराने किल्ल्याचे महत्त्व कमी झाल्यानंतर ही परंपरा कालबाह्य होऊ लागली होती.

सफाळे: पालघर तालुक्यातील ‘सह्याद्री मित्र परिवार’ या दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेने यावर्षी ‘भवानगड’ किल्ल्यावर २४ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता मोहीम राबविली. माकुणसार, केळवे, मथाणे,‌खारेकुरण, बोईसर आणि विरार येथून आलेल्या तब्बल २५ ‌तरुण – तरुणींनी गडावरील वाढलेले गवत आणि तिथला केरकचरा यांची स्वच्छता करून, झेंडूची तोरणे, रांगोळी – फुलांची आरास करून, शस्त्र पूजन करून छत्रपती शिवराय, नरवीर चिमाजी आप्पा आणि ज्ञात अज्ञात वीरांना मानवंदना देऊन किल्ल्यावर “दसरादुर्गोत्सव” हा अनोखा कार्यक्रम साजरा केला.
पूर्वी पावसाळा संपल्यावर गडदुर्गांवर गवताची सफाई करुन किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष करण्याची परंपरा होती. कालांतराने किल्ल्याचे महत्त्व कमी झाल्यानंतर ही परंपरा कालबाह्य होऊ लागली होती. मात्र, आता पुन्हा अलीकडे स्वच्छतेच्या या अनोख्या उपक्रमास ऊर्जितावस्था देत किल्ल्यावर दसरा सण साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर दुर्गप्रेमी संस्थांमार्फत आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या  ९ वर्षांपासून हीच प्रथा पालघर जिल्ह्यातील अनेक गडकोटांवर सह्याद्री मित्र संस्थेचे शिलेदार राबवित आहेत.
परिसरातील अनेक गडकोट नामशेष होण्याच्या मार्गावर असताना भवानगड आपले अस्तित्व बर्‍यापैकी राखून आहे. या गडाची संवर्धनाच्या हेतूने जागृती व्हावी, स्वच्छता राहावी आणि पर्यटकांकडून गडाचे पावित्र्य जपले जावे म्हणून ही मोहीम राबविण्यात आली होती. पालघर परिसरातील किल्ल्यांचा ज्ञात- अज्ञात इतिहास आणि दुर्गसंवर्धन चळवळीची गरज यावेळी सह्याद्री मित्र परिवाराचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यक्त केली. गडकिल्ल्यांवरील अशा प्रकारचे उपक्रम नक्कीच बालवर्ग आणि तरुण मंडळींसाठी संस्कारक्षम ठरू शकतात, अशा भावना मार्गदर्शक उमेश पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच अधिकाधिक स्थानिक तरुणांनी किल्ल्याच्या जतनीकरणाची प्रामाणिक जबाबदारी घेतल्यास काहीच अशक्य नाही असा विश्वास संस्थेचे राजेश वैद्य, निकेश पाटील, राकेश पाटील आणि नीकेत पाटील यांनी व्यक्त केला. शिवरायांच्या जयघोषात आणि राष्ट्रगीताने मोहीमेचा समारोप करण्यात आला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -