जानेवारीतच पाणी आटले, शेतकरी चिंतेत

धरण चारही बाजूंनी ओस पडून अगदी पायथ्याशी पाणी उरले आहे. याशिवाय पिचींगचे कामही खचले आहे. यामुळे कालवेही ओस पडले आहेत.याबाबत या जलसिंचन विभागाच्या वासनिक आणि प्रशांत मोरे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा : मोखाडा तालुक्यातील अनेक ठिकाणची परिस्थिती म्हणजे धरण उशाला अन कोरड घशाला अशी आहे.त्यातच लघु पाटबंधारे विभागाचा अनागोंदी कारभार आता समोर आला असून तालुक्यातील सायदे या धरणाला गळती लागली आहे. चक्क जानेवारीतच हे धरण ओस पडल्याचे चित्र आहे.यामुळे या धरणाच्या शेजारी आणि या धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची शेती धोक्यात आली आहे.यापेक्षा भयंकर म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली थातूर मातूर काम करून मोठ्या प्रमाणावर बिले काढली जात असून एखादा नट दुरुस्त करून दुरुस्ती दाखवली जात आहे. यामुळे हे धरण शेतकर्‍यांच्या नागरीकांच्या फायद्यासाठी बनवले आहे कि अधिकारी आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. धरण चारही बाजूंनी ओस पडून अगदी पायथ्याशी पाणी उरले आहे. याशिवाय पिचींगचे कामही खचले आहे. यामुळे कालवेही ओस पडले आहेत.याबाबत या जलसिंचन विभागाच्या वासनिक आणि प्रशांत मोरे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.

या धरणाची गळती थांबवून याभागातील शेतकर्‍यांना ग्रामस्थांना जर न्याय दिला नाही तर मी सर्व याभागातील बांधवांना घेऊन मोठे आंदोलन छेडणार आहे.
प्रदिप वाघ
-उपसभापती तथा आदिवासी हक्क संघर्ष समिती अध्यक्ष

” माझी शेती आणि गाव या धरणाजवळच आहे. सध्या धरण आटले आहे. यामुळे विहिरीचे पाणी यंदा लवकरच आटून पाणीटंचाई निर्माण होईल. याशिवाय गळतीमुळे बारमाही शेती ओलीताखाली येत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
किशोर शिंदे
शेतकरी,सायदे