चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे

मुंबई : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविली आहे. तर, मंगलप्रभात लोढा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्याने मुंबई भाजपा अध्यक्षपदी अॅड. आशीष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर होते. आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्य़ांच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदिल दाखविला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करून ओबीसी नेत्याकडे प्रदेशाची सूत्रे दिली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने ब्राह्मणी चेहरा पक्षाचा राहू नये याची दक्षता भाजपाने घेतली आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी कालच नाराजी व्यक्त केली होती. त्यावरूनच पूर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि आता राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपावर शरसंधान केले होते. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. आता बावनकुळे यांची नियुक्ती करून टीकाकारांना चोख उत्तर भाजपाने दिले आहे.

तर, आगामी मुंबई महापालिकेत शिवसेनेला चीतपट करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने मुंबई अध्यक्षपदाची धुरा आशीष शेलार यांच्याकडे सोपविली आहे. मुंबईतील भाजपचा महत्त्वाचा चेहरा म्हणून आशीष शेलार यांची ओळख आहे. तसेच भाजपमधील मराठा नेते म्हणूनही ते परिचित आहेत. विशेष म्हणजे, आशीष शेलारांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी अतिशय सलोख्याचे आणि उत्तम संबंध आहेत. त्यामुळे पक्षाच्या बांधणी आणि वाढीसाठी शेलारांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो. 2014ला देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काही काळ त्यांनी शिक्षणमंत्रीपदही भूषवलं होते.

सन 2017मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढविली होती. त्या निवडणुकीची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्या निवडणुकीत तब्बल 83 जागा जिंकत शेलार यांनी आपले नेतृत्व गुण दाखविले होते. त्याआधी भाजपाच्या मुंबई मनपात अवघ्या 33 जागा होत्या. त्यामुळे एकूणच भाजपाने दोन महत्त्वाच्या नियुक्त्या करून केवळ शिवसेनाच नव्हे तर, दोन्ही काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे.