घरराजकारणही आहे खरी मोठ्ठया नेत्यांची अडचण... समजून घ्या, चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर...

ही आहे खरी मोठ्ठया नेत्यांची अडचण… समजून घ्या, चित्रा वाघांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध पक्षांच्या नेत्यांकडे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेत आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवासस्थानीच राहणे पसंत केले होते. यावरून निशाणा साधताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, ‘ही आहे खऱी मोठ्ठ्या नेत्यांची अडचण… समजून घ्या,’ अशी टीका ट्वीटद्वारे केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘हिंदुत्वा’चा मुद्दा उपस्थित करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. परिणामी अल्पमतात आलेले ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांनी भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आता कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातच खरी शिवसेना कोणाची यावरून देखील वाद सुरू असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे.

- Advertisement -

या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व सणउत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळेच दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर गणेशोत्सवही उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यातच विविध महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने त्यात राजकीय उत्साह देखील दिसत आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवाससस्थानासह वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा आमदार प्रसाद लाड तसेच भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याकडे जाऊन तसेच ठाणे शहरातील किसन नगर परिसरातील शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जनजागृती मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले.

यावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘गेली अडीच वर्षे महाराष्ट्राची जनता जेव्हा जेव्हा टीव्ही बघायची तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री आपल्याच घरी बसलेले दिसायचे. त्यामुळे जनतेमध्ये फिरणारे त्यांच्या घरी जाणारे मुख्यमंत्री कधी पहाता आलेच नाहीत. ही आहे खरी मोठ्ठया नेत्यांची अडचण..समजून घ्या,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -