घरराजकारणउद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या नेत्याचा मुलगा कार्यकारिणीत कसा? युवा सेनेच्या बैठकीत सवाल

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या नेत्याचा मुलगा कार्यकारिणीत कसा? युवा सेनेच्या बैठकीत सवाल

Subscribe

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटांतील तेढ वाढतच चालली आहे. शिंदे गटाकडून तर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अतिशय हीन पातळीवर टीका होऊ लागली आहे. त्यात आघाडीवर असलेल्या नेत्याचा मुलगा चक्क ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीत असल्याचे उघड झाले आहे. त्यावर आश्चयर्य व्यक्त करत तो अद्याप कार्यकारिणीत कसा, असा प्रश्न युवा सेनेच्या बैठकीत विचारण्यात आला.

दापोलीतील एका कार्यक्रमात शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पातळी ओलांडली होती. उद्धव ठाकरे हे सतत ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे’ असे सांगत असतात. ही गोष्ट त्यांनी किती वेळा सांगावी. आम्ही कधी नाही म्हटले आहे का? बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असण्याबद्दल तुम्हाला संशय आहे का, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच रश्मी ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, याचेच मला आश्चर्य वाटते, असा खोचक टोला रामदास कदम यांनी लगावला होता.

- Advertisement -

रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम शिंदे गटात गेले आहेत. त्यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम अजूनही ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटीत आहे. अजूनही कार्यकरणीत ते कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. बुधवारच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सोमवारी शिवसेना भवनात ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभागप्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी सिद्धेश कदम यांच्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. त्यांची हक्कालपट्टी का झाली नाही, अशी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

ही बाब उघड होताच अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे विचारणा केली. त्यावर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे दोघांनी सांगितल्यावर विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -