घरराजकारणराजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो, शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो, शिवसेनेचे भाजपावर शरसंधान

Subscribe

मुंबई : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची पुन्हा साथ सोडून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससमवेत सत्ता स्थापन केली. त्यावरून शिवसेनेने भाजपावर शरसंधान राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो, असे शिवसेनेने सुनावले आहे.

बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच ‘शिंदे’ गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे ‘शिंदे’ आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही, असे शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

तेजस्वी यादवही बेधडक आहेत. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है, असे शरसंधान शिवसेनेने भाजपावर केले आहे.

राजदचे उमेदवार पाडल्याचा आरोप
भारतीय जनता पक्ष विश्वासघातकी असल्याचे मत ‘जेडीयू’ने व्यक्त केले. भाजप नितीश कुमार यांच्या पक्षालाच सुरुंग लावायला निघाला, पण तो खेळ भाजपवर उलटला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा लांबलेला पाळणा थोडा हलू लागला असतानाच बिहारात त्यांच्या सत्तेच्या पाळण्याची दोरीच तुटली. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू युती होती, पण निवडणुकीत नितीश कुमारांचे उमेदवार पाडण्याचा उद्योग भाजपने केला. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमारांच्या ‘जेडीयू’ला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या व भाजपने मेहरबानी खात्यात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिले असे चित्र निर्माण केले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांना कानपिचक्या
केंद्रीय मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकू मुख्यमंत्र्यांनी हा ‘बाणा’ समजून घेतला पाहिजे. जेडीयू व तेजस्वी यादवांच्या काही आमदारांवर ‘ईडी’ वगैरेंचा फास आवळला तरीही भाजपच्या गळास कोणी लागले नाही, अशा कानपिचक्या शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या आहेत.

सुशील मोदी यांच्या वक्तव्यामुळे सर्वांचेच वस्त्रहरण
ही आघाडी 2024 मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे. महाराष्ट्रातील ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेप्रमाणेच नड्डा यांची ‘आम्हीच येऊ, फक्त आम्हीच’ ही घोषणा आहे. लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकेल, पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय? बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी आता बरळले आहेत की, ‘शिवसेना आम्ही फोडली. जे आमच्याबरोबर राहणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेला ते भोगावे लागले.’ याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे गट सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार. आम्ही हिंदुत्व किंवा स्वाभिमानासाठी बाहेर पडलो हा दावाच सुशील मोदी यांनी खोडून काढला. शिंदे गट शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी फोडला हे त्यांनी जाहीर केल्यावर सगळय़ांचेच वस्त्रहरण झाले, असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र अशांत टापू
बिहारमध्ये घडणाऱ्या राजकीय क्रांतीचे पडसाद संपूर्ण देशात उमटतात. महाराष्ट्रातले शिवसेना आघाडीचे सरकार पाडले या आनंदात खुशीची गाजरे खात असतानाच बिहारात भाजपविरोधात बंडाची ठिणगी पडली आहे. बाजूला प. बंगाल आहेच. महाराष्ट्रही अशांत टापू बनला आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित मांडून नितीश कुमार यांनी हे धाडसी पाऊल उचलले असेल तर देशातील समस्त विरोधी पक्षाने नितीश कुमारांचे स्वागत केले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

विद्रोहाची मशाल पेटली
2024 साली पुन्हा आम्ही आणि आम्हीच हा भाजपचा अहंकार आहे. ‘देशात 2024 साली फक्त भाजपच राहील, दुसरे कोणी शिल्लक राहणार नाही,’ अशी वल्गना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा करीत होते व तिकडे बिहारसारखे राज्य भाजप गमावत होता. जयप्रकाश नारायण यांच्या भूमीतून ही विद्रोहाची मशाल पेटली आहे. नितीश कुमार हे जयप्रकाश यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात होते. लालू यादवही होते, पण यादव आणि नितीश कुमारांत सतत संघर्ष राहिला, तो आता तरी थांबायला हवा, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -