घररायगडमाथेरानमधील ई-रिक्षाचा प्रवास दहशतीखाली, दगडफेक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

माथेरानमधील ई-रिक्षाचा प्रवास दहशतीखाली, दगडफेक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

२३ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तींकडून ई- रिक्षावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकारामुळे येथील प्रवासी दहशतीखाली प्रवास करत असल्याचा प्रत्यय सध्या माथेरानकरांना येत आहे

दिनेश सुतार
माथेरान- स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात माथेरानसारख्या दळणवळणाच्या दृष्टीने मागासलेल्या पर्यटनस्थळावरील स्वातंत्रपूर्व काळातील गुलामगिरीला हद्दपार करण्यासाठी ब्रिटिशकालीन हातरिक्षा खेचण्याच्या अमानुष प्रथेतून येथील हात रिक्षाचालकांना मुक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या ई-रिक्षा माथेरानकरांसाठी वरदान ठरत आहे. या ई रिक्षाच्या सेवेमुळे आबालवृद्ध, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक तसेच सर्वसामान्य पर्यटकांना ई- रिक्षाचा प्रवास अधिक सोयीसकर पडत आहे. मात्र दिवसागणिक माथेरानच्या प्रवेशद्वारावरच पर्यटकांची फसवणूक करून माथेरानचे पर्यटन बदनाम करणाऱ्या काही लोकांकडून संबंध नसताना उदरनिर्वाहावर गदा येत आहे, असे कारण पुढे करत या ई- रिक्षा प्रकल्पाला वेगवेगळ्या प्रकारे विरोध केला जात आहे. २३ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तींकडून ई- रिक्षावर झालेल्या दगडफेकीच्या प्रकारामुळे येथील प्रवासी दहशतीखाली प्रवास करत असल्याचा प्रत्यय सध्या माथेरानकरांना येत आहे.
सदर प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाद्वारे राबविला जात असून, या ई-रिक्षाच्या विरोधात असणाऱ्या काही लोकांकडून ई रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणण्याचे दृष्टीने येथे सुरू असलेल्या ई-रिक्षांवर सायंकाळी ५:३० ते ६ वाजताच्या सुमारास महात्मा गांधी मार्गावर बाजारपेठेकडे येणाऱ्या रिक्षावर हॉटेल वे साईट जवळ एकाच दिवसात दोन वेळा व अन्य जंगल सदृश्य भागात दगड मारल्याच्या घटनेने येथील प्रवाशी तसेच चालकवर्गात कमालीची घबराट पसरली होती. अखेर २४ रोजी रिक्षाचालक संजय बांगारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादंवि ३३६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ई रिक्षा प्रकल्प ३ महिने प्रायोगिक तत्वावर चालवला जात आहे. मात्र येथील स्थानिक प्रशासनावर ई रिक्षाला विरोध करणाऱ्यांकडून शासनाने नेमलेल्या स्थानिक प्रशासनातील अधिकारी वर्गालाच एक प्रकारे धारेवर धरून आंदोलनाचे दबावतंत्र वापरत प्रशासकीय आधिकाऱ्यांच्याविरोधात खोटे षडयंत्र रचत त्यांची बदलीची मागणी देखील केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला निर्जनस्थळी ई रिक्षांवर दगडफेक करून प्रवाशांना घाबरवण्याचा देखील सर्रास प्रयत्न केला जात आहे. प्रशासनानेच ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत दिली असताना माथेरानकरांच्या समंजसपणामुळे सोमवार ते गुरुवार दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक आणि सकाळी ६ ते दुपारी २:३० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी ही सेवा नेमून दिली आहे. त्याचबरोबर शुक्रवार ते रविवार सकाळी विद्यार्थी वाहतूक आणि दुपारपासून रात्री १० वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकीकरिता नेमून दिली आहे. परंतु काही कारणामुळे या सेवेला थोडा देखील उशीर झाल्यास काही विघ्नसंतोषी लोक प्रवाशांना तसेच ई रिक्षा चालकांना याठीकाणी दमदाटी व शिवीगाळ करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा आहे. परिणामी येथे येणारे जाणारे प्रवासी दहशतीखाली प्रवास करत आहे. यासारख्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर भविष्यात कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील आता माथेरानकर करत आहेत.
————————————————————
मा. सर्वोच्च न्यायालाच्या आदेशाने व सनियंत्रन समितीच्या निर्देशाने माथेरानमध्ये ई रिक्षा ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. अशा प्रकारे कोणी ई रिक्षावर दगड टाकून वेगळा संदेश पाठवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. या 3 महिन्याच्या कालावधी दरम्यान कोणीही ई रिक्षाचा हा प्रकल्प बंद पाडण्याच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माथेरान पोलीस ठाणे शेखर लव्हे यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -