नवी मुंबईतील 30 नगरसेवकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; शिंदे गटात करणार प्रवेश

राज्यात शिवसेना विरुध्द बंडखोर शिंदे गट असा राजकीय सामना रंगलेला आहे. मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे नगरीत मोठया प्रमाणावर फाटाफुट सुरु झाली. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे तब्बल ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले असताना नवी मुंबई महानगरपालिकेतील एका गटाने शिवसेनाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दिवसभर हालचालींना वेग आला असून सर्वात मोठा मतदार असणार्‍या ऐरोली विधानसभा मतदार संघातील २० नगरसेवक पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून शिंदे गटात जाणार आहेत.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते आणि जिल्हाप्रमुख जेष्ठ नगरसेवक द्वारकानाथ भोईर आणि विठ्ठल मोरे यांनी यापुर्वीच मातोश्रीवर जाऊन भेट घेत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे नेते विजय नाहटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले अशा दोन गटांनी आजी माजी नगरसेवकांसह शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील राजकीय हालचाली असताना नवी मुंबईत मात्र शिवसेनेच्या नेत्यांना छुप्पी साधत वेट अ‍ॅण्ड वॉचची भुमिका घेतली होती. मात्र आता ठाणे महापालिकेतील नगरसेवकांच्या पाठिंब्यानंतर नवी मुंबईतील सेनेच्या नगरसेवकांनी देखील बंडाचा निशाण फडकावले आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघावर पकड असलेले माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून २० ते २२ विद्यमान नगरसेवक तर माजी २ नगरसेवक आणि इतर पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक असे ३० नगरसेवक शिवसेनेतून बाहेर पडणार आहेत.

यात नाईक गटातून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह, शिवराम पाटील, किशोर पाटकर, दिपाली सकपाळ, जगदीश गवते, शुभांगी गवते, विलास भोईर, सौ.कचरे, सौ.आचरे अशा प्रमुख लोकप्रतिनिधी आणि विजय चौगुले गटातील ऐरोलीतील बहुसंख्य नगरसेवकांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नवी मुंबईत इतर पक्षातून येऊन शिवबंधनात अडकलेल्या नगरसेवक खासदार राजन विचारे समर्थक गटाने मात्र अद्याप कोणतीही भुमिका घेतलेली नाही. माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे समर्थक असणारे आणि पालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून पद भूषविणारे मनोज हळदणकर मात्र शिवसेनेत राहणार आहेत.


ठाण्यात शिवसेनेला खिंडार, ३ माजी महापौरांसह ६६ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश