रायगडकरांना मास्कपासून मुक्ती

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई नाही, पोलीस अधीक्षकांचे आदेश

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर करण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मास्कचा वापर न करणार्‍यांविरोधात स्थानिक प्रशासन तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. मात्र, आता रायगडकरांना मास्कपासून मुक्ती मिळाली आहे.

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांविरोधात कारवाई न करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना कारवाई न करण्याबाबत पत्र जारी केले आहे.

मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना तसेच निर्बंध लादण्यात आले होते. यामध्ये मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर लावणे, गर्दी टाळणे हे नियम बंधनकारक केले होते. त्यामुळे विनामास्क फिरणार्‍यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. पकडणार्‍या नागरिकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे नागरिक मास्क लावूनच बाहेर पडत होते.

कोरोना आटोक्यात
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीमही योग्य रीतीने राबविण्यात आली आहे पहिला डोस ९९ टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ८७ टक्क्यांच्या वर असल्याने कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करू नका, असे पत्र रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विनामास्क फिरणार्‍या नागरिकांविरोधात कारवाई न करण्याचे आदेश काढले आहेत.