घररायगडज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे कालवश

ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे कालवश

Subscribe

गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारिता क्षेत्रात होते.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक नवीन सोष्टे यांचे निधन झाले. पाऊण महिन्यापूर्वी कोरोनाचे निदान झाल्यामुळे त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या आजारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि सोष्टे यांनी दुपारी या जगाचा निरोप घेतला. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ ते पत्रकारिता क्षेत्रात होते. ज्येष्ठ पत्रकार कै. माधवराव गडकरी आणि कै. राधाकृष्ण नार्वेकर यांना गुरूस्थानी मानून त्यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करून सोष्टे यांनी सामान्यातील सामान्य माणसालाही न्याय मिळवून दिला. परखड लिखाण करताना त्यांनी प्रशासनच नव्हे तर लोकप्रतिनिधींनाही अनेकदा सळो की पळो करून सोडले होते.

सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करताना त्यांनी ग्रामीण भागातून अनेकदा वाहनाशिवाय भटकंती केली किंबहुना भटकंती हा त्यांचा स्थायी भाव होऊन गेला होता. यातूनच त्यांच्या ‘भटकंती’ या पुस्तकाने जन्म घेतला.पत्रकारिता करतानाच साहित्य विश्वात रमलेल्या सोष्टे यांनी विविध विषय पुस्तकांतून मांडले. २३ जुलै १९८९ च्या ‘न भूतो’ महापुरात त्यांचे स्वतःचे घर उद्ध्वस्त झाले. मात्र त्यांनी याच महापुरावर अधारित ‘अंबा काठचे अश्रू’ हे सचित्र पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. या पुस्तकाला प्रचंड लोकप्रियता लाभली. विशेष म्हणजे अमेरिकेसह अन्य काही देशांतील विद्यापीठांनी हे पुस्तक वाचनासाठी उपलब्ध करून देत एक आगळावेगळा गौरव केला. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांना लिखाणाची हौस गप्प बसून देत नव्हती. सोष्टे यांना ‘रायगड भूषण’ यासह अन्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -

नागोठणे पत्रकार संघाचे ते सल्लागार होते. गेल्या ३ महिन्यांत शैलेंद्र देशपांडे, राजेश भिसे यांच्यानंतर सोष्टे यांच्या निधनामुळे पत्रकार संघाला प्रचंड धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी किशोरी, मुले सिद्धार्थ आणि चेतन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अनेक मान्यवरांनी सोष्टे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा – राज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -