घररायगडजांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वनवास

जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा वनवास

Subscribe

रुग्णांचे हाल, इंजेक्शन बाहेरुन आणण्याची नामुष्की

पाली-:  एकीकडे राज्य सरकार आरोग्यदायी योजनांची बरसात करत आहेत. आपला दवाखाना ही संकल्पना देखील जोरदार राबविली जात आहे. मात्र दुसरीकडे कार्यरत असणार्‍या सरकारी रुग्णालयात सुविधाच उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. सुधागड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. (Shortage of staff in primary health centers and sub-centres in Sudhagad taluka And Jambhulpada) येथील जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात धर्नुवातावरील इंजेक्शन आणि खोकल्याच्या औषधांचा साठा संपल्याने येथील आरोग्य सेवक हातावर हात ठेऊन बसले आहेत. रुग्णालयातील औषधाचा साठा संपल्याने रुग्णांना बाहेरुन औषध, इंजेक्शन आणावे, लागत आहेत. त्यामुळे आपलं सरकार, गतीमान सरकार किती गतीमान आहे. हे यावरुन समोर आले आहे.

स्थानिक रहिवासी इम्रान खान हे दुचाकीवरून पडल्याने ते जांभूळपाडा प्राथमिकआरोग्य केंद्रात उपचारार्थ गेले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांना धर्नुवातावरील इंजेक्शन संपल्याने बाहेरून इंजेक्शन आणण्यास कर्मचार्‍याने सांगितले.
सध्या हवामान बदलामुळे खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र यावर औषध घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना देखील औषध उपलब्ध नसल्याने माघारी जावे लागत आहे. त्यातच भरीसभर प्रकार म्हणजे तालुक्यातील आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि कर्मचारी आलेल्या रुग्णांसोबत सदाचाराने बोलत नाहीत. रुग्णाला व्यवस्थित न तपासताच औषधे देतात. ओपीडीची वेळ असतानाही वेळ संपल्याचे सांगून रुग्णांना वेठीस धरत आहेत, अशी माहिती पालीतील सामाजिक कार्यकर्ते कपिल पाटील यांनी दिली. याबाबत लेखी तक्रार दिल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisement -

आरोग्य यंत्रणेचा डोलारा कोलमडल्याने नागरिकांनी संताप
पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण ४३८१० इतकी तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण २८८६१ इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. सुधागड तालुक्यात साधारण १०० महसुली गावे असून तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. मात्र रिक्तपदे, औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. शिवाय अपघातग्रस्तांना योग्य उपचार मिळत नसून गरोदर महिलांना प्रसूतीसाठी अलिबागला जावे लागते. आरोग्य यंत्रणेचा डोलारा कोलमडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

खाजगी रुग्णालयाचा आधार
सध्या सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, टायफाईडच्या आजारांने डोके वर काढले आहे. या आजारावर उपचारासाठी गरीब गरजू सरकार रुग्णालयात येतात. मात्र त्यांना वेळेवर योग्य उपचार आणि औषधे मिळत नाहीत. तर ज्यांची आर्थिक क्षमता भक्कम आहे ते खाजगी रुग्णालाची वाट धरतात. गरजूंना नाईलाजाने पदरमोड करून खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.

- Advertisement -

धर्नुवातावरील इंजेक्शन बाबत माहिती घेऊन ताबडतोब ती उपलब्ध करून देऊ तसेच खोकल्यावरील औषधांचा पुरवठा जिल्हा रुग्णालयातून कमी होत असल्याने त्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे सर्वांना औषधे मिळत नाहीत.
-डॉ.शशिकांत मढवी
(तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -