घररायगडरेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे काम निकृष्ट, थेरोंडा ग्रामस्थ करणार उपोषण

रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे काम निकृष्ट, थेरोंडा ग्रामस्थ करणार उपोषण

Subscribe

थेरोंडा वरसोलपाडा येथील रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून वर्क ऑर्डरमध्ये ५ पाईप च्या मोर्‍या असून त्या देखील टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास त्याचा निचरा होऊ शकणार नाही. परिणामी रस्त्यावर खड्डे पडून लवकरच रस्ता खराब होण्याची मोठी शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील एमएसएच ०४ रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट झाले आहे. त्यामुळे थेरोंडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तसेच अभियंता अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असून स्थानिक ग्रामस्थांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा या २.३५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट २.३५ सुप्रभात इन्फ्राझोन प्रा. लिमिटेडला देण्यात आले आहे. या कामासाठी ११२.४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. काम सुरु करण्याची तारीख १८- ८-२०१७ असून काम पूर्ण करण्याचा कालावधी १ वर्ष असा होता. मात्र प्रत्यक्षात या कामाचा पहिला १०० मिटरचा थेरोंडा वरसोलपाडा येथील क्रॉकीटीकरणाचे काम एप्रिल २०२० मध्ये झाले असून या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. तसेच थेरोंडा वरसोलपाडा येथील उर्वरीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे मे २०२१ पासून चालू झाले असून या ठिकाणी १०० मीमी जाडीची खडी टाकण्यात आली आहे. परंतु अद्याप त्यावर इतर रस्त्याचे कोणतेही साहित्य टाकलेले नसून रस्ता अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत अनेक शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक यांना गंभीर दुखापत झाली असून अनेकांना रुग्णालयात देखील दाखल व्हावे लागले असल्याचे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले.

- Advertisement -

थेरोंडा वरसोलपाडा येथील रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून वर्क ऑर्डरमध्ये ५ पाईप च्या मोर्‍या असून त्या देखील टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास त्याचा निचरा होऊ शकणार नाही. परिणामी रस्त्यावर खड्डे पडून लवकरच रस्ता खराब होण्याची मोठी शक्यता आहे.

या कामासंदर्भात थेरोंडा ग्रामस्थांनी अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाशी संपर्क साधून या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराने केलेल्या कामाचे अंदाजे २३ लाख रुपये अदा करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिल्याचे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले.

- Advertisement -

ग्रामस्थांच्या सहीचे एक पत्र २४ जानेवारी रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय, अलिबाग आणि आमदार महेंद्र दळवी, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना पाठवले आहे. मात्र आजतागायत कोणताही अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आला नाही. आमच्या मागणीला देखील दाद देत नसल्यामुळे व येथे घडणार्‍या अपघाताला रोखण्यासाठी आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा आक्रमक झालेल्या थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -