घरक्रीडाIND vs AUS : 'कर्णधार अजिंक्य रहाणे' यशस्वी होणारच; ईशांतला विश्वास

IND vs AUS : ‘कर्णधार अजिंक्य रहाणे’ यशस्वी होणारच; ईशांतला विश्वास

Subscribe

परदेशात भारताचे नेतृत्व करण्याची रहाणेची पहिलीच वेळ असणार आहे.

भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. रहाणेने याआधी दोन कसोटी सामन्यांत भारताचे कर्णधारपद भूषवले असून दोन्ही सामने भारताने जिंकले होते. मात्र, हे दोन्ही सामने भारतात झाले होते. त्यामुळे परदेशात भारताचे नेतृत्व करण्याची ही रहाणेची पहिलीच वेळ असणार आहे. परंतु, रहाणे कर्णधार म्हणून यशस्वी होईल, असा भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला विश्वास आहे.

अजिंक्य शांत आहे, पण त्याच्यात खूप आत्मविश्वास आहे. माझ्या मते, तो गोलंदाजांचा कर्णधार आहे. आम्ही एकत्र बरेच सामने खेळले आहेत. विराट मैदानावर नसताना अजिंक्यच कसोटी संघाचे नेतृत्व करतो. ‘तुला क्षेत्ररक्षक कुठे हवे आहेत? तुला कधी गोलंदाजी करायची आहे?’, असे प्रश्न तो मला गोलंदाज म्हणून विचारतो. त्यामुळे तो गोलंदाजांचा कर्णधार आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. ‘हे कर, ते कर,’ असे तो कधीही सांगत नाही. संघाने यशस्वी होण्यासाठी कर्णधाराने काय केले पाहिजे हे अजिंक्यला माहित असल्याचे ईशांत म्हणाला.

- Advertisement -

अजिंक्य माणूस म्हणून कसा आहे, हे तुम्हाला तो कर्णधारपद भूषवताना दिसते. तो शांत आणि संयमी आहे. मात्र, तो सतत गंभीर नसतो. त्याला मजा करायलाही आवडते. दबावाच्या परिस्थितीत संयम राखून योग्य तो निर्णय घेण्याची अजिंक्यमध्ये क्षमता आहे. अजिंक्य गोलंदाजांसोबत चर्चा करून त्यांच्यावरील दबाव कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असेही ईशांतने नमूद केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात होणार असून या सामन्यात अजिंक्यच भारताचे नेतृत्व करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -