जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा अनु राणीची धडक

भारतीय खेळाडू अनु राणीने (Annu Rani) पुन्हा एकदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२२च्या (World Championship 2022) भालाफेक स्पर्धेच्या (Javelin Throw) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा राणीने धडक मारली आहे. ब गटातील पात्रता फेरीत ५९.६० मीटरपर्यंत भालाफेक करत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १२ खेळाडू अंतिम फेरीत एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत.

पात्रता फेरीत अनुची सुरुवात खराब झाली होती. पहिल्याच प्रयत्नात तिने फाऊल थ्रो फेकला होता. परंतु दुसऱ्या प्रयत्नात अनुने ५५.३५ मीटरचा भालाफेक करून पुनरागमन केले आणि त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरासह तिने ब गटात पाचवे स्थान पटकावले. अशाच प्रकारची उत्कृष्ट कामगिरी करत तिने गट-अ आणि गट-ब एकत्र करून ८ वे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत तिकीट मिळवले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आता १२ खेळाडूंमध्ये स्पर्धा होणार आहे. अ आणि ब गटातील टॉप-१२ खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे. तर पात्रता फेरीत ६२.५० मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या खेळाडूंनाच फक्त अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे.

६३.८२ मीटर – अनुची सर्वोत्तम कामगिरी

२९ वर्षीय अनु राणीची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ६३.८२ मीटर आहे. ही तिची एकूण सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ती या विक्रमाच्या खूप मागे होती, परंतु असे असतानाही ती अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली.

२०१९ मध्येही अंतिम फेरीत पोहोचलेल्या अनु राणीने दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर तिने अंतिम फेरीत ६१.१२ मीटर पर्यंतचा भालाफेक करत आठवे स्थान पटकावले. लंडनमध्ये २०१७ मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये, ती पात्रता गटात १० व्या स्थानावर होती. परंतु अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही.


हेही वाचा : आयसीसीची वनडे क्रमवारी जाहीर; हार्दिकला फायदा तर रोहित, विराट आणि बुमराहचे नुकसान