घरक्रीडासचिनने बुमराहला दिली ही 'स्पेशल कमेंट'

सचिनने बुमराहला दिली ही ‘स्पेशल कमेंट’

Subscribe

चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद पटकावले. मुंबईच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मोलाचा वाटा होता. त्याने अंतिम सामन्यात ४ षटकांत केवळ १४ धावा देत २ विकेट घेतल्या. मागील १-२ वर्षांत तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते बुमराह हा भारताचाच नाही तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे.

माझ्या मते सध्याच्या घडीला बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे आणि मला आशा आहे की तो येणार्‍या काळात याहूनही चांगली कामगिरी करेल, असे अंतिम सामन्यानंतर सचिनने सांगितले. तसेच आगामी विश्वचषकात भारताला चांगले प्रदर्शन करायचे असल्यास बुमराह हा संघासाठी सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल असेही सचिन याआधी म्हणाला आहे.

- Advertisement -

बुमराहचा मुंबई संघातील सहकारी युवराज सिंगनेही त्याची स्तुती केली. तो म्हणाला, बुमराहची गोलंदाजीची शैली (अ‍ॅक्शन) जरा वेगळी आहे आणि त्यामुळे तो कोणत्या वेगाने गोलंदाजी करणार, हे फलंदाजाला कळण्यात अडचण येते. माझ्या मते तो सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत आहे. मुंबईने चेन्नईला अंतिम सामन्यात १५० धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या ४ षटकांत ४२ धावांची गरज होती.

शेन वॉटसनसारखा फलंदाज मैदानात असतानाही बुमराहने १७ आणि १९व्या षटकात मिळून केवळ १३ धावा (४ बाईज) दिल्याने मुंबईला हा सामना जिंकणे सोपे झाले. या सामन्यानंतर तुझ्या सातत्यपूर्ण प्रदर्शनाचे रहस्य काय असे विचारले असता बुमराह म्हणाला, मी गोलंदाजी करत असताना फार गोष्टींचा विचार करत नाही. मी फक्त एकावेळी एका दिवसाचा आणि एका चेंडूचा विचार करतो. तुम्ही जेव्हा फार गोष्टींचा विचार करत नाही, तेव्हा तुमच्यावर जास्त दबाव येत नाही. मी कोणत्याही परिस्थितीत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -