घरक्रीडाहार्दिकची कपिल देव यांच्याशी तुलना नकोच!

हार्दिकची कपिल देव यांच्याशी तुलना नकोच!

Subscribe

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याची महान कपिल देव यांच्याशी तुलनाच होऊच शकत नाही, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने व्यक्त केले. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांत ५२४८ धावा केल्या होत्या आणि ४३४ विकेटही मिळवल्या होत्या. तसेच २२५ एकदिवसीय सामन्यांत ३७८३ धावा करत २५३ बळीही घेतले होते. त्यामुळे ते क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जातात. हार्दिक अष्टपैलू म्हणून कपिल देव यांच्या आसपासही नसून त्याला मोठा खेळाडू होण्यासाठी आणखी बरीच मेहनत घेण्याची गरज आहे असे रझाकला वाटते.

हार्दिक चांगला खेळाडू आहे, पण अष्टपैलू म्हणून त्याच्यात आणखी खूप सुधारणा होऊ शकते. त्याने आणखी मेहनत घेतली पाहिजे. तुम्ही जेव्हा खेळाला पुरेसा वेळ देत नाही, तेव्हा तुम्हाला अपेक्षित निकाल मिळत नाहीत. त्याने मानसिक आणि शारीरिकदृष्टया आणखी चांगली तयारी केली पाहिजे. मागील काही काळात त्याला दुखापतींनी सतावले आहे. तुम्हाला जेव्हा खूप पैसे मिळायला लागतात, तेव्हा तुम्ही मेहनत कमी घेता. हे प्रत्येकच खेळाडूबाबत घडते. मोहम्मद आमिरने कमी मेहनत घेतली आणि त्यामुळे त्याची कामगिरी खालावली, असे रझाक म्हणाला.

- Advertisement -

तसेच त्याने पुढे सांगितले, कपिल देव आणि इम्रान खान हे क्रिकेट इतिहासातील दोन सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आहेत. हार्दिक त्यांच्या आसपासही नाही. मीसुद्धा अष्टपैलू होतो. मात्र, मी माझी इम्रान यांच्याशी तुलना करणार नाही. कपिल आणि इम्रान यांचा दर्जा वेगळाच होता. त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही.

बुमराह अव्वल दर्जाचा गोलंदाज बनेल!
अब्दुल रझाकने काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला “बेबी बॉलर” असे संबोधले होते आणि त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. मात्र, आता त्याने त्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. मी बुमराहच्या विरोधात नाही. मी फक्त त्याची तुलना ग्लेन मॅकग्रा, वसिम अक्रम, कर्टली अँब्रोस, शोएब अख्तर यांच्याशी करत होतो. बुमराहपेक्षा त्या गोलंदाजांविरुद्ध खेळणे जास्त आव्हानात्मक होते. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. बुमराह अव्वल दर्जाचा गोलंदाज बनेल यात शंका नाही. मात्र, आमच्या काळात त्याच्यापेक्षाही चांगले गोलंदाज होते, असे रझाक म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -