मला फार पुढचा विचार करायला आवडत नाही!

rohit sharma
रोहित शर्माचे उद्गार

फार पुढचा विचार केल्यास दबाव येत असल्याने मी अल्पकालीन योजना आखतो, असे विधान भारताचा सलामीवीर रोहित शर्माने केले. तसेच रोहितला ध्येय ठरवायला आवडतात आणि भविष्यातही तो फार पुढचा विचार करणे टाळणार आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणार्‍या रोहितने आतापर्यंत ३२ कसोटी, २२४ एकदिवसीय आणि १०८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तो कोणतीही मालिका सुरू होण्याआधी स्वतःसमोर काही लक्ष्य ठेवतो आणि ते गाठण्याचा प्रयत्न करतो.

फार पुढचा विचार करणे तुमच्या हिताचे नसते हे आता मला बरीच वर्षे खेळल्यानंतर कळले आहे. यामुळे तुमच्यावर दबाव आणि ताण येतो. मी नेहमी अल्पकालीन योजना आखतो. मला केवळ पुढील २-३ महिन्यांचा आणि काही सामन्यांचा विचार करायला आवडते. कोणाविरुद्ध खेळणार आहे आणि चांगली कामगिरी करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे यावर मी लक्ष केंद्रित करतो. प्रत्येक मालिका किंवा स्पर्धेआधी मी स्वतःसमोर काही लक्ष्य ठेवतो. याचा मला खूप फायदा झाला आहे. मी भविष्यातही हेच करत राहणार आहे, असे रोहितने सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व खेळही बंद असून खेळाडूंना घरातच थांबून राहावे लागत आहे. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा होईल आणि लवकर पुन्हा खेळांना सुरुवात होऊ शकेल अशी रोहितला आशा आहे. आम्हाला लवकर पुन्हा क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर आम्ही कोणाविरुद्ध खेळणार याचा विचार करता येऊ शकेल. वर्षाअखेर आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय मालिकाही खेळणार आहोत. मात्र, आम्ही पुन्हा मैदानात कधी उतरणार हे आताच सांगणे अवघड आहे, असे रोहितने नमूद केले.

…म्हणून मी पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेत नाही -शिखर धवन

शिखर धवन आणि रोहित शर्मा हे २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या डावाची सुरुवात करत आहेत. पहिल्यांदा सलामी करण्याआधी हे दोघेही डावाचा पहिला चेंडू खेळण्यास उत्सुक नव्हते. अखेर रोहित स्ट्राईक घेण्यास तयार झाला. त्यानंतरही शिखरने कधी पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेतलेली नाही असे रोहित गमतीत म्हणाला होता. याबाबत शिखरला विचारले असता त्याने सांगितले, मला डावाचा पहिला चेंडू खेळायला आवडत नाही. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मी पुनरागमन करत होतो आणि रोहित पहिल्यांदा परदेशात सलामीवीर म्हणून खेळत होता. पुनरागमन करत असल्याने माझ्यावर थोडे दडपण होते. त्यामुळे रोहितने स्ट्राईक घेतली. त्या सामन्यात आम्ही शतकी भागीदारी केली. त्यामुळे आम्ही पुढेही यात बदल न करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच मी पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेत नाही, असे शिखर म्हणाला.