IND vs SL : श्रीलंकेला मोठा धक्का; ‘हा’ प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या सर्व सामन्यांना मुकणार

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी (१८ जुलै) खेळला जाणार आहे.

kusal perera to miss india tour
भारताविरुद्धचे सामने सुरु होण्यापूर्वीच श्रीलंकेला धक्का 

भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला १३ जुलैला सुरुवात होणार होती. परंतु, श्रीलंकन संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना येत्या रविवारी (१८ जुलै) खेळला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज कुसाल परेरा भारताविरुद्धच्या सर्व सामन्यांना मुकणार आहे. परेराने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात श्रीलंकन संघाचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र, आता दुखापतीमुळे त्याला भारताविरुद्धच्या सर्व सामन्यांना मुकावे लागणार आहे, असे श्रीलंका क्रिकेटने (SLC) शुक्रवारी सांगितले.

परेराच्या उजव्या खांद्याला दुखापत

कुसाल जनिथ परेरा दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० या मालिकांमध्ये खेळू शकणार नाही. सरावादरम्यान यष्टीरक्षक-फलंदाज परेराच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली, असे श्रीलंका क्रिकेटने आपल्या पत्रकात म्हटले. परेरा श्रीलंकेचा प्रमुख यष्टीरक्षक, तसेच सलामीवीर आहे. त्यामुळे तो भारताविरुद्ध खेळू न शकणे हा श्रीलंकन संघासाठी मोठा धक्का आहे. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात श्रीलंकन संघाचे नेतृत्व केले होते आणि या दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७३ धावांची खेळी केली होती.

बिनुरा फर्नांडो वनडे मालिकेतून आऊट

तसेच श्रीलंकेला आणखी एक धक्का बसला असून डावखुरा वेगवान गोलंदाज बिनुरा फर्नांडो तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. गुरुवारी (१५ जुलै) झालेल्या सराव सत्रादरम्यान फर्नांडोच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे श्रीलंका क्रिकेटकडून सांगण्यात आले. मात्र, तो टी-२० मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे.