घरक्रीडासलामीसाठी 'हा' भारताचा सर्वोत्तम पर्याय - संजय मांजरेकर

सलामीसाठी ‘हा’ भारताचा सर्वोत्तम पर्याय – संजय मांजरेकर

Subscribe

भारताचे सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत निराशाजनक प्रदर्शन केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच भारताचे सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी या दोन्ही सामन्यांत निराशाजनक प्रदर्शन केले. तर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी उर्वरित दोन सामन्यांसाठी मयांक अगरवालची निवड झाली आहे. त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्याच्यासोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न अजूनही आहेच. भारताचे माजी खेळाडू आणि आताचे क्रिकेट समीक्षक संजय मांजरेकर यांच्यामते मयांकसोबत सलामीला येण्यासाठी विजय किंवा राहुलपेक्षा हनुमा विहारी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

त्याच्याकडे चांगले तंत्र आहे  

संजय मांजरेकर म्हणाले, “माझ्यामते ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या आणि परिस्थितीत हनुमा विहारी हा सलामीवीर म्हणून भारताचा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही जेव्हा त्याची फलंदाजी पाहता तेव्हा तुम्हाला कळते त्याच्याकडे चांगले तंत्र आहे. त्याचे प्राधान्य सरळ फटके मारण्यावर असते. तसेच तो शांत वृत्तीचा खेळाडू आहे. मला वाटते की तो सलामीवीर म्हणून यशस्वी होईल.”

अगरवालकडून फार अपेक्षा ठेऊन चालणार नाही  

तसेच त्यांनी मयांक अगरवालबाबतही काही मते मांडली. “मयांकला पुढील सामन्यात संधी मिळाली पाहिजे. मात्र त्याच्याकडून संघाला फार अपेक्षा ठेऊन चालणार नाही. कारण ऑस्ट्रेलियामध्ये परदेशी खेळाडूला पदार्पण करणे सोपे नसते. त्यातही तो सलामीवीर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवातीच्या काही षटकांत खेळणे फारच अवघड असते. त्यामुळे त्याच्यावर फार दबाव टाकता कामा नये.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -