घरक्रीडाराखीव खेळाडूंना मिळणार संधी?

राखीव खेळाडूंना मिळणार संधी?

Subscribe

भारत-विंडीज तिसरा टी-२० सामना आज

अमेरिकेमध्ये झालेले पहिले दोन सामने जिंकून विराट कोहलीच्या भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजयी आघाडी मिळवली. ही मालिका पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे गयाना येथे होणार्‍या या मालिकेतील तिसर्‍या आणि अंतिम लढतीत पहिल्या दोन सामन्यात न खेळलेल्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. रविवारी झालेला दुसर्‍या टी-२० सामना भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६७ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना विंडीजची १५.३ षटकांनंतर ४ बाद ९८ अशी धावसंख्या होती. मात्र, डकवर्थ-लुईस नियमानुसार त्यांना १२१ धावा करणे गरजेचे होते. त्यामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने हा सामना २२ धावांनी जिंकला.

दुसरा सामना जिंकत मालिका जिंकल्यामुळे आता आम्ही इतर खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो. ही मालिका जिंकणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट होते, असे दुसर्‍या सामन्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात राहुल चहर, दीपक चहर या गोलंदाजांसह लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

राहुलला पहिल्या सामन्यापासून संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मधल्या फळीत त्याच्याऐवजी भारताने मनीष पांडेची संघात निवड केली. तसेच राहुल राखीव यष्टीरक्षक म्हणूनही संघात आहे. युवा रिषभ पंतला पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ ४ धावा करता आल्या आहेत. तसेच यष्टिरक्षणातही त्याने काही चुका केल्या. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात राहुलला पांडे किंवा पंतच्या जागी संधी मिळू शकेल. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन हे आपले स्थान कायम राखतील असा अंदाज आहे.

राहुल चहर करणार पदार्पण?
गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या यांनी या टी-२० मालिकेत सर्वांना प्रभावित केले आहे. रविंद्र जाडेजाचे प्रदर्शन मात्र दोन्ही सामन्यांत साधारण होते. त्यामुळे त्याच्या जागी युवा लेगस्पिनर राहुल चहर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकेल. मागील आयपीएल, स्थानिक क्रिकेट आणि भारत ’अ’कडून दमदार प्रदर्शन केल्यामुळे त्याची भारताच्या संघात निवड झाली आहे. त्याचा भाऊ दीपकही या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विंडीज फलंदाजांची निराशाजनक कामगिरी
वेस्ट इंडिजकडून दुसर्‍या टी-२० सामन्यात रोवमन पॉवेलने अप्रतिम अर्धशतक झळकावले. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे विंडीजचा पराभव झाला. पहिल्या सामन्यातही विंडीजच्या फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही, अपवाद फक्त ४९ धावा करणार्‍या किरॉन पोलार्डचा. त्यामुळे तिसरा सामना जिंकत, व्हाईटवॉश टाळण्यासाठी फलंदाजांनी आपल्या खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी

वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), अँथनी ब्रॅम्बल, जॉन कॅम्पबल, शेल्डन कॉटरेल, शिमरॉन हेटमायर, इव्हन लुईस, सुनील नरीन, किमो पॉल, खेरी पिएर, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रोवमन पॉवल, ओशेन थॉमस, जेसन मोहम्मद

सामन्याची वेळ – रात्री ८ पासून
थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -