IPL 2021 : सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका; ‘हा’ प्रमुख गोलंदाज उर्वरित मोसमाला मुकणार 

गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला माघार घेणे भाग पडले आहे. 

t natrajan and bhuvneshwar kumar
टी. नटराजन आणि भुवनेश्वर कुमार 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाची सनरायजर्स हैदराबाद संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. त्यांनी सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पंजाब किंग्सवर मात करत यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली होती. हैदराबाद संघ आता दमदार पुनरागमन करणार असे वाटत असतानाच त्यांना मोठा झटका बसला आहे. हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन उर्वरित मोसमाला मुकणार आहे. नटराजनची यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. या दौऱ्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यातून तो पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले आहे.

केवळ दोन सामने खेळला

नटराजनला यंदा केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. तो कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांविरुद्ध खेळला. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली. बुधवारी हैदराबादने मोसमातील पहिला विजय नोंदवल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नरला नटराजनविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी नटराजनच्या गुडघ्याला दुखापत असल्याचे वॉर्नर म्हणाला होता.

मागील आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी

नटराजनने मागील आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत त्याने हैदराबादसाठी प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावताना १६ सामन्यांत १६ विकेट घेतल्या. त्याने अखेरच्या षटकांत यॉर्कर आणि स्लोवर बॉलचा चांगला वापर करत फलंदाजांना अडचणीत टाकले होते. त्यामुळे त्याची भारतीय संघातही निवड झाली.