IPL : किंग्स इलेव्हन पंजाब ग्लेन मॅक्सवेलला देणार सोडचिट्ठी?

आयपीएलच्या पुढील मोसमाला सहा महिन्यांहूनही कमी कालावधी शिल्लक आहे.

glenn maxwell
ग्लेन मॅक्सवेल

किंग्स इलेव्हन पंजाबला नुकत्याच झालेल्या आयपीएल मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. मात्र, असे असले तरी पंजाबचा संघ कर्णधार लोकेश राहुल आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या पुढील मोसमाला सहा महिन्यांहूनही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पंजाबचे व्यवस्थापन आणि संघमालक संघात मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पंजाबचा संघ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला सोडचिट्ठी देऊ शकेल.

कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी यंदाच्या मोसमात केलेल्या कामगिरीने संघमालक खुश आहेत. राहुलने फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि स्पर्धेच्या उत्तरार्धात कर्णधार म्हणून संघाला एकत्र आणले. त्यामुळे संघाला दमदार पुनरागमन करणे शक्य झाले. आता आम्हाला आमचे प्रमुख खेळाडू मिळाले आहेत. आम्हाला मधल्या फळीत थोडे बदल करावे लागणार आहेत. मोठे फटके मारू शकतील असे मधल्या फळीतील फलंदाज आम्हाला हवे आहेत. तसेच मोहम्मद शमीला साथ देऊ शकेल अशा चांगल्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे, असे या संघाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मॅक्सवेलला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. खेळाडू लिलावात पंजाबने मॅक्सवेलला १०.७५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र, त्याला १३ सामन्यांत केवळ १०८ धावाच करता आल्या. तसेच पंजाबचे संघमालक वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलच्या कामगिरीवरही फारसे खुश नाहीत. मॅक्सवेल आणि कॉट्रेल या परदेशी खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुढील मोसमासाठी हे दोघे पंजाबच्या संघात कायम राहण्याची शक्यता कमी असल्याचेही सूत्रांनी सांगितले.