मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चुकीची माहिती पसरवणे थांबवा; क्रीडा मंत्र्यांनी केले आवाहन

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करूया, असे रिजिजू म्हणाले.

milkha singh and kiren rijiju
मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चुकीची माहिती पसरवणे थांबवा; क्रीडा मंत्र्यांनी केले आवाहन

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवा, असे आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. ‘मिल्खा सिंग हे देशाची शान आहेत. त्यांच्यासारख्या महान खेळाडूबद्दल चुकीच्या बातम्या आणि माहिती पसरवणे कृपया थांबवा. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करूया,’ असे रिजिजू ट्विट करत म्हणाले. मिल्खा सिंग सध्या कोरोनाशी झुंज देत असून त्यांना पीजीआयएमई रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची अधिकृत माहिती शनिवारी देण्यात आली.

डॉक्टर्स त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून

‘सर्व वैद्यकीय मापदंडांच्या आधारे आज म्हणजेच ५ जूनला मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत कालपेक्षा सुधारणा आहे,’ असे पीजीआयएमई रुग्णालयाचे प्रवक्ते प्रो. अशोक कुमार यांनी शनिवारी सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी मिल्खा सिंग यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर ते चंदीगड येथे आपल्या घरीच क्वारंटाईन होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी चंदीगडच्या पीजीआयएमई रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता या रुग्णालयाचे डॉक्टर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस 

त्याआधी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून मिल्खा सिंग यांची विचारपूस केली होती. मिल्खा सिंग लवकरच बरे होतील आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना आशीर्वाद देतील, अशी आशा मोदी यांनी यावेळी व्यक्त केली होती. मिल्खा सिंग यांची भारतीय खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होते. एशियाड आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते भारताचे एकमेव खेळाडू आहेत.