माझी वसुंधरा अभियान; अमृत शहराच्या गटांमध्ये मुंबई महापालिका तृतीय स्थानी

Mazi vasundhara Campaign; BMC ranks third among the groups of amrit city
माझी वसुंधरा अभियान; अमृत शहराच्या गटांमध्ये मुंबई महापालिका तृतीय स्थानी

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत अमृत शहराच्या गटांमध्ये ‘मुंबई महापालिका तृतीय स्थानी’ आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, पालिकेला प्राप्त झालेला पुरस्कार ऑनलाईन स्वीकारला आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत २०२०- २१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत “अमृत शहरांच्या गटामध्ये” सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई महापालिकेने तृतीय स्थान पटकाविले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडलेल्या ऑनलाईन समारंभाला उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित होते. या ऑनलाईन सन्मान सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या वतीने हा ऑनलाइन पुरस्कार स्वीकारला.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी आपल्या शहराने केलेल्या या  कामगिरीबाबत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.