PAK vs BAN: बांगलादेशात सरावातच फडकला पाकचा झेंडा; नव्या वादाला तोंड फोडले

टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानचा संघ आता सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे आणि अशातच बांगलादेशमध्ये एका घटनेमुळे पाकिस्तानी संघाला टिकेचा सामना करावा लागत आहे

टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानचा संघ आता सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे आणि अशातच बांगलादेशमध्ये एका घटनेमुळे पाकिस्तानी संघाला टिकेचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी संघाने मीरपूर येथील क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानचा झेंडा लावून सराव केला आहे. यामुळे पाकिस्तानी संघावर टिका टिप्पणी होत असतानाच आता एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबतीत अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की पाकिस्तानी संघ मागील काही महिन्यांपासून सरावादरम्यान देशाचा झेंडा लावत आहे. पाकिस्तानचा संघ बांगलादेशमध्ये ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला टी-२० सामना शुक्रवारी होणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक टिकाकारांनी इतिहासाचा दाखला देत या वादावर म्हटले की सरावादरम्यान झेंडा लावण्याचा अर्थ म्हणजे एक राजकिय संदेश देणे असा होतो. पाकिस्तानकडून असे पहिल्यांदाच झाले नाही याच वर्षात विश्वचषकाच्या पूर्वी जेव्हा न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता तेव्हा देखील पाकिस्तानी संघाने सरावादरम्यान झेंडा लावला होता.

सकलेन मुश्ताकने केली होती सुरूवात

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे मॅनेजर इब्राहिम बदीस यांनी सांगितले की, “या प्रकाराला मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताकने सुरू केले होते”. तर यापूर्वी पाकिस्तानच्या १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघांच्या सरावाच्या वेळी पाकिस्तानचा झेंडा फडकवला आहे. मिसबाह-उल-हक नंतर सकलेन मुश्ताकने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळला आहे. सकलेन मुश्ताकने पाकिस्तानी संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेत झेंडा लावून सरावास सुरूवात केली होती. त्यानंतर टी-२० विश्वचषकात देखील असे केले आहे. असे इब्राहिम बदीस यांनी सांगितले. तर सकलेन मुश्ताकने टी-२० विश्वचषकाच्या दरम्यान म्हटले होते की, “हा संघ देशाचे प्रतिनीधित्व करत आहे आणि झेंड्याने असे वाटते की आमची २२ कोटी जणता आमच्या सोबत आहेत”. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मीडिया विभागाने भाष्य करण्यास नकार दिला.

सामन्यादरम्यान झेंड्यासंबधी कोणता नियम, कायदा नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दरम्यान मैदानात अथवा सरावादरम्यान झेंडा लावण्यावर बांगलादेश क्रिकेटकडे कोणताच विशेष नियम किंवा कायदा नाही. द्विपक्षीय मालिकेत सहभागी होणाऱ्या संघाच्या देशाचा सामन्यादरम्यान झेंडा फडकवला जातो. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्हीही संघातील खेळाडू मैदानावर उभे राहून आपापल्या देशाचे राष्ट्रगीत बोलतात. २०१४ मध्ये मीरपूर येथे आशिया कप स्पर्धेच्या दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून प्रेक्षकांना मैदानात विदेशी झेंडे फडकावण्यावर निर्बंध लावले होते. मात्र आंतरराष्ट्रीय मीडियाने केलेल्या टिकेमुळे एका दिवसांतच हे निर्बंध हटवण्यात आले होते.


हे ही वाचा: http://BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची ICC च्या अध्यक्षपदी निवड