घरक्रीडाप्रीमियर लीग : लेस्टर सिटीची आर्सनलवर मात

प्रीमियर लीग : लेस्टर सिटीची आर्सनलवर मात

Subscribe

जेमी वार्डी आणि जेम्स मॅडिसनने केलेल्या गोलमुळे लेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनलवर २-० अशी मात केली. हा त्यांचा १२ सामन्यांतील आठवा विजय होता. त्यामुळे २६ गुणांसह त्यांनी गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच चेल्सीने क्रिस्टल पॅलेसचा २-० असा पराभव केला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते, पण उत्तरार्धात टॅमी अब्राहम आणि क्रिस्टियन पुलिसीचने गोल करत चेल्सीला विजय मिळवून दिला. लेस्टरप्रमाणे चेल्सीचेही १२ सामन्यांत २६ गुण आहेत. मात्र, चांगल्या गोल सरासरीमुळे लेस्टर दुसर्‍या, तर चेल्सी तिसर्‍या स्थानावर आहे.

लेस्टर आणि आर्सनल यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांच्या बचावफळींनी चांगला खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करण्यासाठी झुंजावे लागले. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला आर्सनलचा स्ट्रायकर अ‍ॅलेक्झांडर लॅकाझेटला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याला फटका गोलवर मारता आला नाही. यानंतर सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला लेस्टरच्या वार्डीला आर्सनलच्या कॅलम चेंबर्सने गोल करण्यापासून अडवले. त्यामुळे मध्यंतराला या सामन्यात गोलशून्य बरोबरी होती.

- Advertisement -

मध्यंतरानंतर लेस्टरने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ४९ व्या मिनिटाला त्यांच्या विल्फ्रिड एंडीडीने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. मात्र, त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. याचा त्यांना फायदा अखेर ६८ व्या मिनिटाला मिळाला. युरी टिलीमन्सच्या पासवर वार्डीने गोल करत लेस्टरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. काही मिनिटांनंतर डिमारी ग्रेने मारलेला फटका आर्सनलचा गोलरक्षक लेनोने अडवला. मात्र, ७५ व्या मिनिटाला वार्डीच्या पासवर मॅडिसनने गोल केला आणि लेस्टरला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनी ही आघाडी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला.

टॉटनहॅम-शेफील्ड सामन्यात बरोबरी

- Advertisement -

टॉटनहॅम आणि शेफील्ड युनायटेड यांच्यातील प्रीमियर लीगचा सामना १-१ असा बरोबरीत संपला. सॉन ह्युंग-मिनच्या गोलमुळे टॉटनहॅमला आघाडी मिळाली. परंतु, ७८ व्या मिनिटाला जॉर्ज बाल्डोकने गोल केल्यामुळे शेफील्डने या सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. टॉटनहॅमच्या संघाला यंदाच्या मोसमात चांगला खेळ करता आलेला नाही. त्यांनी १२ पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत, तर त्यांचे ५ सामने बरोबरीत राहिले आहे आणि त्यांनी ४ सामने गमावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -