T20 world cup 2021: ENG VS NZ पहिल्या उपांत्य फेरीत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने

पहिल्या उपांत्य फेरीसाठी ग्रुप ए च्या पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंड आणि ग्रुप बी च्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड यांच्यात आज लढत होणार आहे

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ चा हंगाम शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. दोन्ही गटातील आघाडीच्या दोन संघाची उपांत्य फेरीसाठीची नावे निश्चित झाली आहेत. ग्रुप ए मधून इग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर ग्रुप बी कडून पाकिस्तान आणि न्यूझीलंड अशा चार संघाची नावे उपांत्य फेरीसाठी निश्चित झाली आहेत. पहिल्या उपांत्य फेरीसाठी ग्रुप ए च्या पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंड आणि ग्रुप बी च्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंड यांच्यात आज लढत होणार आहे. इंग्लंडचा संघ ग्रुप ए मधील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.

इंग्लंडच्या संघाने ५ सामन्यांत ४ विजय मिळवत ८ अंकासह उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तर न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून भारतीय संघाला बाहेरचा रस्ता दाखवत ८ अंकासह उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये आज होणाऱ्या लढतीतील विजयी संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी प्रवेश करेल.

इंग्लंडचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास

  • पहिल्या सामन्यात वेस्टइंडीजचा ६ गडी राखून पराभव केला.
  • दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला.
  • तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला.
  • चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा २६ धावांनी पराभव केला.
  • पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून १० गडी राखून पराभूत.

सध्या सुरू असलेल्या विश्वचषकाच्या सुरूवातीला इंग्लंडच्या संघाला यूएईच्या मैदानावर खेळण्यास अडचणी येतील अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघातील फलंदाजांना अगदी चितपट केले. तर फलंदाजांनी साजेशी खेळी करत छोट्या आव्हानांचा पाठलाग करून संघाला विजय मिळवून दिले.

न्यूझीलंडचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास

पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून ५ गडी राखून पराभूत.
दुसऱ्या सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा १६ धावांनी पराभव केला.
चौथ्या सामन्यात नामिबियाचा ५२ धावांनी पराभव केला.
पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला.

न्यूझीलंडची सर्वात मोठी ताकद कर्णधार केन विलियमसन आहे. त्याने प्रत्येक सामन्यात संघाला कठीण परिस्थितीतून सावरले आहे. सोबतच वेगवान गोलंदाज ट्रेंन्ट बोल्टने विश्वचषकात चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने पाच सामन्यात ११ बळी पटकावले आहेत. त्याच्यासोबतच इश सोधीने ८ गडी पटकावले आहेत.


हे ही वाचा: IND VS NZ : रोहित शर्मा टी-२० चा नवा कर्णधार; नव्या चेहऱ्यांसह नव्या संघाची घोषणा