घरक्रीडाकहाणी यशस्वी कर्णधारांची

कहाणी यशस्वी कर्णधारांची

Subscribe

केन विल्यमसन, विराट कोहली, एरॉन फिंच या तीन कर्णधारांनी आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. कोहली, विल्यमसन यांचे संघ अपराजीत असून फिंचचा ऑस्टे्रलियन संघ एका पराभवानंतरही अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाला आतापर्यंत कडव्या लढतींना सामोरे जावे लागलेले नाही, अपवाद दक्षिण आफ्रिकेविरुध्द लढतीचा ! कर्णधार विल्यम्सनने नाबाद शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेवर न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

एक बाजू लावून धरत, अखेरपर्यंत किल्ला लढवण्याची जिगर किवीजचा कर्णधार केन विल्यम्सनने दाखविली. दक्षिण आफ्रिकेच्या रबाडा, एनगिडी या तेज जोडगोळीचा त्याने नेटाने मुकाबला केला. ताहिरच्या फसव्या फिरकीवर तो खेळपट्टीवर तग धरून राहिला. 138 चेंडूत शतक फटकावून दक्षिण आफ्रिकन संघााच्या तोडातील विजयाचा घास त्याने हिरावून घेतला. अनुभवी साथीदार झटपट बाद होत असताना ग्रँडहोमच्या साथीने उपयुक्त भागीदारी रचण्याची भूमिका त्याने निभावली. तळाच्या संघांविरुध्द विजय मिळविणार्‍या न्यूझीलंडची कसोटी लागेल ती विंडीज, ऑस्टे्रलिया, इंग्लंड, पाकिस्तान या तुलनेने बलाढ्य संघांशी.

- Advertisement -

ऑस्टे्रलिया, पाकिस्तानसारख्या संघाचे आव्हान परतवून लावणार्‍या विराट कोहलीच्या भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्या दमदार सलामीनंतर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला येणार्‍या विराट कोहलीने ऑस्टे्रेलियाविरुध्द 82 धावांची संयमी खेळी केली तसेेच पाकविरुध्द झटपट 77 धावा फटकावल्या. ‘मधल्या फळीचा कणा’ असे विराटबाबत म्हणावे लागेल. कर्णधारपदाची धुरा वाहताना फलंदाजीचा भार देखील सक्षमपणे वाहण्याची ताकद त्याच्या बॅटमध्ये आहे. आपल्या तरुण संघसहकार्‍यांची उमेद वाढविण्याची कलाही त्याला चांगलीच अवगत झाली आहे. दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारनंतर विजय शंकरला नवा चेंडू देण्याची त्याची चाल यशस्वी ठरली. चौथ्या क्रमांकावर विजयला त्याने संधी दिली ती अफगाणिस्तान विरुध्द. मैदानावरील त्याचा वावर चित्ताकर्षकच. चेंडूचा पाठलाग करताना मैदानावर डाईव्ह मारण्याचे त्याचे कसब वाखाणण्याजोगेच.

ओव्हलवर ऑस्टे्रलियाविरुध्दच्या सामन्यात कोहलीचे नवे रुप पाहायला मिळाले. वर्षभराच्या बंदीनंतर खेळणार्‍या स्टीव स्मिथची भारतीय प्रेक्षकांकडून हेटाळणी सुरु होती. तेव्हा कोहलीने या पे्रक्षकांना तसे न करण्याबाबत सुनावले. पूर्वीचा चिडखोरपणा आता त्याच्या वागण्यात दिसून येत नाही. शांत वृत्तीचा संयमी कर्णधार अशी कोहलीची प्रतिमा बनत असून भारतीय क्रिकेटसाठी ही आल्हाददायक बाब.

- Advertisement -

एरॉन फिंचने ऑस्टे्रलियन संघाच्या नेतृत्वाची धुरा वाहताना डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूंसह नवोदितांच्या साथीने ऑस्टे्रलियाची पताका दुमदुमत ठेवली आहे. वॉर्नरच्या साथीने सलामीला येत भक्कम पायाभरणीची भूमिका तर तो वठवतो आहे. फिंचने वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुध्द 153 धावांची खेळी केली. ऑस्टे्रलियन कर्णधाराची वर्ल्डकपमधील ही सर्वोच्च खेळी. एका शतकासह तीन अर्धशतके फटकावणार्‍या फिंचने दोन शतकी तसेच दोन अर्धशतकी सलामी वॉर्नरच्या साथीने त्याने करून दिली. तसेच संघाला बाद फेरीत नेण्यासाठी आपल्या सहकार्‍यांकडून चांगली कामगिरी करून घेण्यातही तो तरबेज आहे. सहाव्या वर्ल्डकप जेतेपदासाठी ऑस्टे्रलिया उत्सुक असून प्रतिस्पर्धांचे आव्हान स्वीकारुन ते परतवण्याची ताकदही फिंचच्या संघात आहे का? ते येत्या महिन्याभरात समजेल.

इऑन मॉर्गनने अफगाणिस्तानविरुघ्द 17 विक्रमी षटकारांसह 148 धावा फटकावल्या. 6 पैकी 4 सामने जिंकणार्‍या यजमान इंग्लंडला पहिल्यावहिल्या वर्ल्डकप जेतेपदाची स्वप्ने पडत असली तरी पाकिस्तान, श्रीलंका या आशियाई संघांनी इंग्लंडला त्यांच्या मायभूमीतच पराभूत करण्याचा पराक्रम केल्यामुळे इंग्लंडच्या आगेकूच करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.25 जून रोजी लॉर्डसवर इंग्लंड-ऑस्टे्रलिया यांच्यातील लढत चुरशीची ठरावी तसेच भारत, न्यूझीलंडविरुध्दच्या लढतीही यजमान संघासाठी निश्चितच सोप्या नसतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -