घरक्रीडाTokyo Olympics : वंदना कटारियाच्या कुटुंबीयांबाबत जातीवाचक शेरेबाजी अतिशय निंदनीय - राणी...

Tokyo Olympics : वंदना कटारियाच्या कुटुंबीयांबाबत जातीवाचक शेरेबाजी अतिशय निंदनीय – राणी रामपाल

Subscribe

उपांत्य फेरीतील पराभवानंतर वंदना कटारियाच्या कुटुंबीयांबाबत जातीवाचक शेरेबाजीची घटना घडली.

भारतीय महिला हॉकी संघासाठी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ऐतिहासिक ठरल्या. भारताच्या या संघाला ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. परंतु, या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाने भारताला २-१ असे पराभूत केले. या पराभवानंतर भारताची खेळाडू वंदना कटारियाच्या कुटुंबीयांबाबत जातीवाचक शेरेबाजीची घटना घडली. अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर वंदनाच्या हरिद्वारमधील रोशनाबाद येथील घरासमोर गावातीलच काही जणांनी फटाके फोडले. वंदनाच्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर आल्यानंतर शेजाऱ्यांपैकी काहींनी जातीवाचक शेरेबाजीही केली. घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय होता, असे भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली.

आम्ही एकत्र येऊन आमच्या देशासाठी खेळतो

देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे जात आणि धर्मावरून शेरेबाजी थांबली पाहिजे. आम्ही देशाच्या विविध भागांतून येतो. आमचे धर्म वेगवेगळे आहेत. मात्र, आम्ही एकत्र येऊन आमच्या देशासाठी खेळतो. त्यानंतरही काही लोक अशाप्रकाची वागणूक आम्हाला देत असल्याचे पाहून फार वाईट वाटते. ही गोष्ट फारच लाजिरवाणी असल्याचे रामपाल म्हणाली.

पुन्हा हे घडणार नाही अशी आशा

वंदनाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये चार गोल करण्याची दमदार कामगिरी केली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली आणि ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला हॉकीपटू ठरली. तिच्या कुटुंबियांसोबत घडलेल्या प्रकारातून लोक शिकतील आणि पुन्हा हे घडणार नाही, अशी रामपालला आशा आहे. घडलेला प्रकार फारच वाईट आहे. आता लोक यातून धडा घेतील आणि पुन्हा असा प्रकार आपल्याला पाहावा लागणार अशीच मला आशा असल्याचे रामपालने नमूद केले.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -