Tokyo Olympics : भारताच्या ऑलिम्पिक पथकासोबत पंतप्रधान मोदींचा ब्रेकफास्ट

मोदींनी भारतीय खेळाडूंशी संवादही साधला.

narendra modi meets indian athletes
भारताच्या ऑलिम्पिक पथकासोबत पंतप्रधान मोदींचा ब्रेकफास्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या सोहळ्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचे कौतुक केले होते. त्यानंतर सोमवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी भारताच्या ऑलिम्पिक पथकाची भेट घेतली. मोदींनी भारतीय खेळाडूंना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला. भारतासाठी यंदाचे ऑलिम्पिक ऐतिहासिक ठरले होते. भारतीय खेळाडूंना टोकियोमध्ये सात पदके जिंकण्यात यश आले आणि ही भारताची ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकवून दिले. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या संबोधनपर भाषणात युवा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले होते.

पंतप्रधानांनी केले होते कौतुक  

भारताच्या युवा पिढीने ऑलिम्पिकमध्ये केलेल्या दमदार कामगिरीचा देशाला अभिमान आहे. हे खेळाडू आज इथे उपस्थित आहेत. या खेळाडूंनी केवळ आपली मने जिंकली नसून त्यांच्या कामगिरीने आपल्या देशातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. तसेच त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंसाठी टाळ्या वाजवण्याचे उपस्थित मान्यवर आणि देशभरात सोहळा पाहणाऱ्या देशवासियांना आवाहन केले होते.

भारताची विक्रमी कामगिरी 

भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी सात पदके जिंकण्यात यश आले. नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी दहिया यांनी रौप्यपदक पटकावले. तसेच बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, भारतीय पुरुष हॉकी संघ, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन या भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.