घरक्रीडाTokyo Olympics : सिंधू पदकापासून एक विजय दूर; यामागूचीवर मात करत उपांत्य...

Tokyo Olympics : सिंधू पदकापासून एक विजय दूर; यामागूचीवर मात करत उपांत्य फेरीत धडक 

Subscribe

सिंधूने अकाने यामागूचीचा सरळ गेममध्ये पराभव केला.

भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. सिंधूने शुक्रवारी (आज) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान जपानच्या अकाने यामागूचीचा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह तिने उपांत्य फेरीत धडक मारली असून ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्या पदकापासून ती आता केवळ एक विजय दूर आहे. सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये पदार्पणात रौप्यपदकाची कमाई केली होती. यंदा तिला सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात असून तिने आतापर्यंत सलग चार सामन्यांत विजय मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे.

पहिला गेम २१-१३ असा जिंकला

शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने अकाने यामागूचीचा २१-१३, २२-२० असा पराभव केला. या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. यामागूचीने तिला झुंज देण्याचा प्रयत्न केला. सिंधूने तिच्या उंचीचा फायदा करून घेतला. तिने संपूर्ण कोर्टचा चांगला वापर करून घेत तिच्यापेक्षा कमी उंचीच्या यामागूचीला थकवले. याचा फायदा सिंधूला झाला आणि पहिल्या गेमच्या मध्यंतराला तिने ११-७ अशी भक्कम आघाडी मिळवली. यानंतरही तिने उत्तम खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-१३ असा जिंकला.

- Advertisement -

यामागूचीची झुंज अपयशी  

दुसऱ्या गेममध्ये थकलेल्या यामागूचीला सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे सिंधूला दुसऱ्या गेमच्या मध्यंतराला ११-७ अशी आघाडी घेण्यात यश आले. यानंतर यामागूप्रमाणेच सिंधूला थकवा जाणवल्याचे दिसले. मात्र, दोघींनी झुंजार खेळ केला. यामागूचीने दमदार पुनरागमन करत गेममध्ये आधी १५-१५ अशी बरोबरी केली. यानंतर यामागूचीने २०-१८ अशी आघाडी घेतल्याने तिला दोन गेम पॉईंटची संधी होती. परंतु, सिंधूने गेम पॉईंट वाचवले आणि आणखी एक गुण मिळवत २१-२० अशी आघाडी घेतली. तसेच पुढील गुणही तिने मिळवत हा गेम २२-२० असा जिंकत उपांत्य फेरी गाठली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -