आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकतीच पार पडलेली बॉर्डर गावसकर कसोटी मालिका भारताने 2-1 जिंकली आणि सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर ट्रॉफी आपल्या जवळ ठेवली. यानंतर आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीनुसार विराट कोहलीने फलंदाजीत मोठी झेप घेतली आहे. कोहलीने कसोटीत आठ फलंदाजांना मागे टाकत 13 व्या स्थानी झेप घेतली आहे.

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या नंबरचा फलंदाज होता. अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 364 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 186 धावांची खेळी केली होती. या दमदार खेळीमुळे विराट कोहलीला 54 रेटिंगचा फायदा झाला आणि त्याने फलंदाजांना मागे टाकत 13 व्या स्थानी झेप घेतली. विराट कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मा एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो 739 रेटिंगसह दहाव्या स्थानावर पोहचला आहे. ऋषभ पंत कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

अश्विन गोलंदाजीत नंबर १ वर
आर अश्विनने गोलंदाजीत अव्वल स्थान गाठले आहे. तो 869 रेटिंगसह कसोटीत अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनला पछाडत अश्विनने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. जेम्स अँडरसनचे आता 859 रेटिंग गुणासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील 4 सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्यामुळे तो नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी अँडरसन हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता. पण मालिका संपल्यानंतर आता अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे.

अव्वल चार अष्टपैलू खेळाडूंमध्ये तीन भारतीय
आयसीसीने नुकत्याच जाहिर केलेल्या क्रमवारीनुसार भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी अव्वल चार मध्ये जागा मिळवली आहे. या क्रमवारीत रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर, तर आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. बॉर्डर गावसकर मालिकेत अक्षर पटेल याने 264 धावांचा केल्या आणि उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शनही केले. परिणामी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अक्षर पटेल चौथ्या स्थानावर पोहचला आहे. अव्वल चार अष्टपैलू खेळाडूंमध्ये आता तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

7 जून रोजी जागितक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना
न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर 7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.