दर ५ मिनिटाला विक्री होतेय या कारची; सलग सहा महिने पहिल्या क्रमांकावर

Hyundai Creta car sold every 5 minutes

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०२० रोजी नवीन क्रेटा लॉन्च करण्यात आली. एका आठवड्यानंतर कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परंतु लॉकडाऊन दरम्यान नवीन क्रेटा देखील विकली गेली. मार्च ते आत्तापर्यंतची आकडेवारी दर्शवते की क्रेटाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवीन क्रेटाला जोरदार मागणी आहे. गेले सहा महिने पहिल्या क्रमांकावर आहे.

क्रेटाने या ६ महिन्यांत एकूण ४६,०५१ वाहने विकली. सप्टेंबर २०२० मध्ये क्रेटाने १२,३२५ युनिटची विक्री केली. एका महिन्यात या कारची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. इतकंच नव्हे तर कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन क्रेटाचे १.१५ लाखांपेक्षा अधिक बुकिंग आतापर्यंत झालं आहे. त्याचबरोबर मागील ५ वर्षात ५.२ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच कंपनी दर ५ मिनिटांनी ह्युंदाई क्रेटा विकत आहे. क्रेटाच्या जुन्या आणि नवीन जनरेशनच्या मॉडेलसह आतापर्यंत ५.२ लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. ह्युंदाईने २०१५ मध्ये क्रेटा बाजारात आणली.

नवीन क्रेटाचं रूप बदलण्यात आलं आहे आणि त्यासह बरीच फीचर्स अपडेट केली गेली आहेत. ज्यामुळे ग्राहक पहिल्या नजरेत नवीन क्रेटाला पसंती देत आहेत. नवीन क्रेटा एसयूव्ही ५ इंजिन-गिअरबॉक्स कॉम्बिनेशन आणि ५ व्हेरिएंट्स लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर बेस मॉडेलची (एक्स-शोरूम) किंमत ९.९९ लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत १७.२० लाख रुपये आहे. नवीन क्रेटा डिझेल इंजिनला ६-स्पीड टॉर्क कनव्हर्टर स्वयंचलित गिअरबॉक्स मिळतो. भारतीय बाजारपेठेत क्रेटाची स्पर्धा किआ सेल्टोस (Kia Seltos), एमजी हेक्टर (MG Hector), महिंद्रा एक्सयूव्ही ५०० (Mahindra XUV 500) आणि टाटा हॅरियर (TATA Harrier) सारख्या एसयूव्हीशी आहे.

नवीन ह्युंदाई क्रेटामध्ये BSVI पेट्रोल आणि BSVI डिझेल इंजिन पर्याय आहेत. यात 1.5L पेट्रोल, 1.4L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डीझेल इंजिन पर्याय आहेत. Hyundai Creta 2020 E, EX, S, SX आणि SX(O) या पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षेविषयी बोलायचं झालं तर, २०२० ह्युंदाई क्रेटामध्ये ड्युअल एअरबॅग, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीटबेल्ट रिमाइंडर, आपत्कालीन स्टॉप सिग्नल आहेत. या व्यतिरिक्त कारच्या टॉप मॉडेलमध्ये ६ एअरबॅग, इलेक्ट्रिक स्थिरता नियंत्रण (Electronic stability control,), वाहन स्थिरता व्यवस्थापन (Vehicle stability management), हिल स्टार्ट असिस्टंट कंट्रोल, रियर डिस्क ब्रेक, स्टीयरिंग अ‍ॅडॉप्टिव्ह पार्किंग दिशानिर्देशांसह रियर कॅमेरा, ISOFIX आणि बर्गलर अलार्म (burglar alarm) देण्यात आला आहे.