विद्यार्थीनीचे अपहरण करणारा “अंडापाव” गुजरातमधून ताब्यात

उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल दोन महिने फरार असलेला कुख्यात गुन्हेगार संतोष सायन्ना उर्फ अंडापाव याला उल्हासनगर गुन्हे शाखेने गुजरात मधून अटक केली आहे. अपहरणा व्यतिरिक्त तो दोन गुन्ह्यात फरार होता.
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे संतोष उर्फ अंडापाव याने अपहरण केले आणि पळून गेला होता.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा मुलीच्या वडिलांनी दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखा करीत होती. अंडापाव हा आरोपी उल्हासनगर परिसरात राहत नसून तो कोठेतरी बाहेरील जिल्हयात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र आरोपी संतोष उर्फ अंडापाव याचा मोबाईल नंबर मिळून येत नसल्याने त्याचा तांत्रिक पद्धतीने शोध घेणे कठीण जात होते.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक किशोर महाशब्दे, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, प्रसाद तोंडलीकर आदींनी त्याच्या मित्राचा मोबाईल फोन नंबर मिळवला. त्या मोबाईल नंबरच्या सीडीआरचे तांत्रीक विश्लेषण करून अपहृत मुलगी आणि आरोपी सध्या गुजरात राज्यात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे लागलीच पोलीस उप निरीक्षक किशोर महाशब्दे, कैलाश इंगळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक निसार तडवी, पोलीस हवालदार उज्वला मर्चंडे, ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकात पाटील, प्रसाद तोंडलीकर, निलेश अहिरे,अर्जुन मुत्तलगिरी, योगेश वाघ, गोणश गावडे, शेखर भावेकर यांची पथके तयार करून गुजरात राज्य येथे तपासाकरिता पाठवली.

तांत्रिक माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा रचून अपहृत मुलगी आणि आरोपी संतोष उर्फ अंडापाव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीला उल्हासनगर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्यावर उल्हासनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा आणि टिटवाळा येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहेत. त्याच्यावर चोरी, लूटमार, मारामारी गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.