घरठाणेचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगा

Subscribe

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन

 भारतीय हवामान विभागाच्या वेळोवेळी प्राप्त पुर्वसूचनांनूसार जून २०२३ मध्ये अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना, मच्छिमारांना व नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले आहे.
बिपरजोय चक्रीवादळ तसेच अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासंदर्भात नागरिकांनी तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी प्राधिकरणाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व विभागांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. दुरध्वनी क्रमांक सुरु आहेत, याची खात्री करावी. आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद द्यावा. मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर तात्काळ परत बोलाविण्यात यावे, पुढील सूचनामिळेपर्यंत मासेमारीसाठी परवाना देण्यात येवू नये, तसेच मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात यावी, मासेमारी जेट्टींवर सूचना फलक लावण्यात यावेत. बोटीमधून प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवासी वाहतूक थांबविण्यात यावी. प्रवासी बोटीवर जीवनावश्यक लाईफ जॅकेटस्, बोयाज उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी, सर्व समुद्र किनाऱ्यावरील वॉटरस्पोर्टस उपक्रम थांबविण्यात यावेत, पर्यटकांना, नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा, चक्रीवादळामुळे झाडे पडल्यास ती तोडण्यासाठी कटर, झाडे हटविण्यासाठीची जेसीबी इ. आवश्यक साधने तत्पर उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी, मोबाईल टॉवर पडल्यास पर्यायी संपर्क व्यवस्था उपलब्ध करावी, तसेच मोबाईल टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास टॉवरच्या ठिकाणी विद्युत जनरेटर उपलब्ध करावेत.  विद्युत पुरवठा- झाडे पडणे, पोल पडणे यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो, अशावेळी योग्य मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध होईल, याचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने करावे. रुग्णवाहिका, हॉस्पीटलमधील आपत्कालीन वैद्यकिय सुविधा तत्पर ठेवाव्यात. शासकीय रुग्णालयामधील वैद्यकिय अधिकारी संबंधित रुग्णालयांमध्ये उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यामध्ये देण्यात आल्या आहेत.
तसेच चक्रीवादळ, मौसमी पावसाच्या काळात झाडे पडल्यामुळे पाणी भरल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था, वाहतूक पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक, झाड हटविण्यासाठी साहित्य तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. ज्याविभागाच्या अधिकारक्षेत्रात रस्ता पूल येतो, त्या विभागांनी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे. याची संबंधित विभागाची सर्वस्वी जबाबदारी राहील. घडलेल्या घटनांचा अहवाल तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास सादर करावा, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
 सखल भागात अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता राहील. त्यादृष्टीने योग्य त्या उपाय योजना कराव्यात. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी निवडलेल्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. चक्रीवादळ व मान्सून पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पट्टीचे पोहचणारे यांची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. त्याबाबत अद्ययावत यादी करुन प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच चक्रीवादळ व मान्सुन कालावधीत नोंदणीकृत मच्छिमार संघटना यांचेशी समन्वय ठेवून आवश्यक कारवाई करावी. चक्रीवादळ व मान्सुन कालावधीत पुरपरिस्थिती निर्माण होवुन रेल्वे रुळांवर पाणी आल्यामूळे किंवा वाहतुक विस्कळीत होत असल्यास त्याबाबत आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात तसेच जिल्हा प्रशासनाशी आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -