डोंबिवलीतील लोढा हेवनमधील इमारतीला तडे

स्लॅब खचू लागला, २४० कुटुंबे क्षणात विस्थापित

डोंबिवलीत कल्याण–शिळ मार्गावर लोढा हेवन गृह प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामधील शांती उपवन नावाची पाच इमारतींचे समूह असलेली पाच मजली इमारतीला शनिवारी सायंकाळी अचानक तडे गेले व स्लॅब देखील खचू लागला. त्यामुळे जीवित हानी टाळण्यासाठी या इमारती मधील रहिवाशांनी तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले . मात्र अवघ्या २२ वर्षात इमारत राहण्यास निकामी झाल्याने तब्बल २४० कुटुंबांचे संसार एका क्षणात रस्त्यावर येवून त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत शांती उपवन इमारतीमध्ये सर्व काही व्यवस्थित होते .मात्र सायंकाळ नंतर अचानक इमारतीला तडे गेल्याचे दिसून आले .हळू हळू इमारतीचा स्लॅब देखील खचू लागला. त्यातून रेती – सिमेंट बाहेर पडू लागले. त्यामुळे इमारतीच्या परिसरात एकच भीती पसरली. याची माहिती केडीएमसी, अग्निशमन दल व पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जीवित हानी टाळण्यासाठी इमारतीमधील सर्व रहिवशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या सर्व विस्थापित झालेल्या रहिवाशांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था जवळच्या एका शाळेत करण्यात आली आहे. दरम्यान , ‘लोढा हेवन’ नावाच्या विकासाशी आमचा संबंध नाही. असा खुलासा लोढा कंपनीकडून करण्यात आला आहे.

ही इमारत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २७ गावांमध्ये असली तरी अधिकृत इमारत आहे. सुमारे २२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीत राहणारे सर्व रहिवासी हे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय आहेत. सर्वसाधारण अधिकृत इमारतींचे आयुष्यमान ३० ते ३५ वर्षाहून अधिक असते. मात्र ही इमारत २२ वर्षातच राहण्यासाठी धोकादायक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात म्हत्वाचे म्हणजे अनेकांनी २० वर्षांचे गृह कर्ज काढून या इमारतीत घरे घेतली होती. त्यांचे आता कुठे कर्ज फिटले तर काहींचे बाकीही असेल तोपर्यंत इमारत राहण्यासाठी निकामी झाली आणि २४० कुटुंबे एकाच क्षणी रस्त्यावर आली आहेत. एकंदरीत डोंबिवलीतील अनधिकृत इमारती १५ ते २० वर्षात धोकादायक होतात तशीच अवस्था या इमारतीची झाली आहे. ही धोकादायक झालेली इमारत तातडीने पाडायची किंवा कसे ? याबाबतचा निर्णय पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्यांचा सल्ला घेवून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली. मात्र लोढा कंपनीने यावर खुलासा केला असून लोढा हेवन नावाच्या विकासाशी संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

*आमचा संबंध नाही ; लोढा कंपनीचे स्पष्टीकरण

“शांती उपवन’ ही इमारत लोढा/मॅक्रोटेक डेव्हलपर्सने विकसित केलेली नाही आणि २० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या ‘लोढा हेवन’ नावाच्या विकासाशी आमचा संबंध नाही. आम्ही रहिवाशांशी सहानुभूती बाळगतो आणि मानवतावादी कारणास्तव आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार आहोत.” असे लोढा कंपनीच्या प्रवक्ते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.