Eco friendly bappa Competition
घर ठाणे कचरा, वीज प्रकल्पाला डायघरवासीयांचा विरोध

कचरा, वीज प्रकल्पाला डायघरवासीयांचा विरोध

Subscribe
डायघर येथे येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कचरा प्रकल्पात वीज निर्मिती केली जाणार आहे. मात्र, त्याच प्रकल्पाविरोधात स्वातंत्र्यदिनी तेथील स्थानिकांनी निशाण फडकावला आहे. हा विरोध करताना, स्थानिकांनी कित्येक वर्षात येथील गावांना मुलभुत सोई सुविधा देण्यात आलेल्या नसतांना आता कचरा आमच्या दारी कशासाठी असा सवालही उपस्थित केला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून रेंगाललेल्या महापालिकेच्या कचरा प्रकल्प आता कुठे मार्गी लागत असताना, या विरोधाने पुन्हा एकदा हा प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर लवकरच मनसेचे स्थानिक आमदार राजू ( प्रमोद) पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दिवा येथील डंम्पीग गाऊंड बंद केल्यानंतर पालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा प्रकल्प सुरु केला होता. परंतु ऐन पावसाळ्यात येथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला. शेतीचे होणारे नुकसान, विविध आजारांचे वाढते प्रमाण यामुळे हा प्रकल्प तत्काळ बंद करण्याची मागणी करीत स्थानिकांनी आंदोलन केले होते.  तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा प्रकल्प ३१ आॅगस्ट नंतर बंद होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच डायघर येथील महापालिकेच्या जागेवर कचरा प्रकल्प सुरु केला जाईल असेही स्पष्ट झाले होते. त्यानुसार डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार याठिकाणी मशीन देखील आल्याचे पालिकेने सांगितले आहे.
ऐकीकडे काही दिवसांनी हा प्रकल्प सुरू होणार असताना, आता तेथील काही स्थानिकांनी १५ आॅगस्टच्या दिवशी येथील दत्त मंदिरात बैठक घेऊन या प्रकल्पाच्या विरोध दर्शविला आहे. तसेच यावेळी पंचक्रोशी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून काही झाले तरी कचरा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. हा विरोधात देसाई शिळ, डायघर, पडले, देसाई, खिडकाली येथील ग्रामस्थ एकवटले असून प्रत्येक गावा-गावात मिटिंग घेऊन विरोध करण्याचे ठरवले आहे. या बैठकीला  माजी नगरसेवक संतोष केणे, माजी नगरसेवक बाबाजी पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी कल्याण जिल्हा तालुका अध्यक्ष मधुकर माळी(भोपर), समाज सेवक शिवाजी माळी( भोपर) तसेच सर्वपक्षीय  युवा मोर्चाचे प्रमुख संघटक प्रेमनाथ (कोळे गाव)  यांच्या आसपासच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे ठाणे शहरात आजच्या घडीला १ हजार मेट्रीक टन  निर्माण होणारा कचरा आणि मागील २००८ पासून याठिकाणी प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिका प्रशासणाच्या अडचणीत भर पडली आहे. जर १ सप्टेंबर ला प्रकल्प सुरू झाला नाहीतर शहरातील कचरा टाकायचा कुठे असाच प्रश्न महापालिका प्रशासनासमोर नव्याने उभा राहिला आहे.
”  डायघर डंपिंगला विरोध करताना मुलभुत सोई सुविधा अद्यापही आम्हाला मिळालेल्या नाहीत, साधा डायघर गावासाठी रस्ता देखील नाही, गटार, पायवाटांचा अभाव आहे, असे असतांना कचरा प्रकल्पामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही”
–  जितेंद्र पावशे, पंचक्रोशी संघर्ष समिती, पदाधिकारी.
” या बाबत दुजारो देताना, सर्वच शहरात कचराभूमी फक्त कचरा टाकण्यासाठी वापरता कामा नये. कचर्‍यावर जागच्या जागी विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना तसे होताना दिसत नाही. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. संयुक्त कचरा प्रक्रिया प्रकल्प वेळेत मार्गी लावण्याची गरज आहे.”

– हिरा पाटील, पंचक्रोशी संघर्ष समिती,  पदाधिकारी.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -