घरthaneकल्याणच्या आचार्य अत्रे रंगमदिरात रंगली एकांकिका स्पर्धा

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमदिरात रंगली एकांकिका स्पर्धा

Subscribe

एसएसटी महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘श्री सिद्ध ठाकूरनाथ महाकरंडक’ ची अंतिम फेरी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या दिमाखात पार पडली. महाकरंडकचे हे पहिले वर्ष असूनही स्पर्धेला सर्वच स्तरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई व्यतिरिक्त वसई, विरार, नाशिक, चिपळूण आणि अहमदनगर अशा विविध ठिकाणांहून प्रवेशिकांची नोंद झाली. महाविद्यालयात तीन दिवस चाललेल्या प्राथमिक फेरीतील 30 पेक्षा अधिक एकांकिकांमधून परीक्षकांनी निवडलेल्या आठ एकांकिका अंतिम फेरीत सादर करण्यात आल्या. अंतिम फेरीतील उत्तमोत्तम आठ एकांकिकांचा प्रेक्षकांनी आस्वाद घेतला. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ अनुभवी लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर आणि अभिनेत्री मृणाल चेंबूरकर यांनी काम पाहिले. याशिवाय महा करंडक च्या दिमाखदार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक निलेश सावे आणि मुंबई विद्यापीठाच्या ठाणे जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक अर्चना प्रभूदेसाई यांची उपस्थिती लाभली.

महा करंडकच्या अंतिम फेरीतील निकालात वेशभूषा, संगीत, नेपथ्य, अभिनेता आणि दिग्दर्शन या विभागात द्वितीय तर प्रकाश योजनेत प्रथम पुरस्कार ’द मुंबई स्टोरीज’ या एकांकिकेने आपल्या नावे केली. ’खुदीराम’ एकांकिकेने उत्तम वेशभूषा, संगीत आणि दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक पटकावले. नेपथ्याचे पहिले पारितोषिक ’नारायणास्त्र’ या एकांकिकेने तर प्रकाश योजना यासाठी प्रथम पारितोषिक ’सप्तपदी’ एकांकिकेने आणि लेखनाचे द्वितीय आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक ’पडदा’ या एकांकिकेने मिळवले. सर्वोत्कृष्ट लेखक,अभिनेता, अभिनेत्री ह्या बक्षीसांवर ’इंटरोगेशन’ या एकांकिकेची छाप राहिली. महा करंडकचे प्रमुख आकर्षण म्हणजे तीस हजार रोख आणि महाकरंडक चषक हे ’इंटरोगेशन’ या एकांकिकेने पटकावले. द्वितीय क्रमांकावर वीस हजाराचे रोख पारितोषिक आणि चषक ’खुदीराम’ या एकांकिकेच्या नावे झाले. तर ’मुंबई स्टोरीज’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे रुपये दहा हजार रोख आणि चषक असे बक्षीस मिळाले. सर्व वैयक्तिक प्रथम पारितोषिक धारकांना सन्मानचिन्ह सोबतच एक हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. बक्षीस समारंभामध्ये परीक्षक आणि मान्यवरांसोबतच एस एस टी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य आणि एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे यांचीही उपस्थिती लाभली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -