घरठाणेअस्नोलीत शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

अस्नोलीत शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

Subscribe

शेतक-याने आरडाओरड केल्याने बिबट्या धूम ठोकून पळून गेला

शहापूर तालुक्यातील अस्नोलीच्या जंगलात बिबट्याचा वावर असून उंबरवाडी येथील शेतकर्‍यावर रविवारी पहाटे 4 च्या सुमारास त्याने हल्ला केला. शेतक-याने आरडाओरड केल्याने बिबट्या धूम ठोकून पळून गेला. सुमारे दहा दिवसांपासून हा बिबट्या येथे अनेकांना दिसला आहे. त्याने कुत्री व इतर प्राण्यांना जखमी केले असल्याचे शेतकरी सांगतात.

अस्नोली उंबरवाडी येथील शेतघराच्या गोठ्यातील बांधलेले बैल पहाटे जोर जोरात हालचाल करू लागल्याने त्याच्या आवाजाने शेतकरी शरद हेमा ठोंबरे उठले. त्याचवेळी तेथील कोंबड्यांवर झडप घालण्याचा बिबट्याचा अंदाज चुकला. भेदरलेल्या बिबट्याने तेथून पळ काढल्याने सुदैवाने शेतकर्‍याचे प्राण वाचले. सहा महिन्यांपूर्वी किन्हवली आणि परीसरात फिरणार्‍या बिबट्याने अस्नोली हद्दीत स्थलांतर केले असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. सुमारे दहा दिवसांपासून या बिबट्याचा अस्नोली- उंबरवाडी, तईचीवाडी, शेंडेवाडी,जांभे धरणाचा परिसर वाड्या वस्त्या आदी ठिकाणी रात्रीच्या सुमारास संचार असून त्याने आतापर्यंत तीन ते चार कुत्री फस्त केली आहेत.

- Advertisement -

शेतावर गोठे असलेल्या काही शेतकर्‍यांना बिबट्या दिसला असल्याचे शेतकरी सांगतात. रानात भटकणारी कुत्री बिबट्याच्या दहशतीने गावाबाहेर पडत नाहीत. या अगोदर अनेक गुरांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे.
शहापूर वनविभागाचे धसई वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर आणि त्यांच्या सहकारी यांनी हद्दीतील जंगलात गस्त घालून बिबट्याच्या अस्तित्वाच्या खुणा कुठे सापडतात का याचा शोध घेत आहेत. जळण्यासाठी सरपण आणायला किंवा बिनकामाचे जंगलात जाऊ नये. शक्यतो गुरे गोठ्यातच बांधावी, तसेच गुरे चारताना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने ग्रामस्थांना केले आहे. अनेक दिवसांपासून अस्नोली आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत असून या बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दिनकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -