घरठाणेमराठी भाषा विश्वव्यापी झालीय - अशोक नायगावकर

मराठी भाषा विश्वव्यापी झालीय – अशोक नायगावकर

Subscribe

कवितेचे कार्यक्रम करीत मी अमेरिकेसह अन्य देशात फिरतो तेव्हा मराठी कविता ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमते. ते पाहून असे वाटते की, माझ्या मराठी भाषेला मरण नसून मराठी भाषा ही विश्वव्यापी झाली आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी मराठी भाषा गौरव‍ दिनी ठाण्यात केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांच्या संकल्पनेतून निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके, प्रशांत रोडे महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी व रसिक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात प्रा.डॉ. प्रज्ञा पवार, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, कवयित्री संजीवनी तडेगावकर, आप्पा ठाकूर, प्रा. अनंत राऊत, अशोक कोतवाल, गझलकार संदीप माळवी, प्रशांत डिंगणकर सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासह कवी महेश केळूसकर आणि विजय चोरमारे यांनी देखील कविता सादर केल्या. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात  कार्यक्रम सुरू आहेत, मुंबई- ठाण्यात देखील दिवसभर कार्यक्रम सुरू असल्यामुळे मराठी भाषेचा जागर सुरू आहे. त्यामुळे कार्यक्रमाला दर्दी रसिक उपस्थित असले तरी जेव्हा मी परदेशात कवितांचे कार्यक्रम सादर करतो तेव्हा माझ्यासमोर चारशे ते पाचशे रसिक मराठी कविता ऐकण्यासाठी उपस्थित राहतात, तेव्हा असे वाटते की माझ्या माय मराठीला मरण नसून मराठी भाषा ही वैश्विक झाली आहे, त्यामुळे आज जरी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असलो तरी मराठी भाषा ही कधीच लोप पावणार नाही असेही ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी नमूद करीत मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी सादर करतो. परंतु यावेळी नुसतेच पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. ज्या महनीय व्यक्तींची जयंती आहे त्यांचे कार्य व माहिती कळावी यासाठी त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना सुचली आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांचे व्याख्यान ठेवून या कार्यक्रमाची सुरूवात केली असल्याचे बांगर यांनी नमूद केले, त्यानंतर लगेचच मराठी भाषा गौरव दिन असल्यामुळे या कविसंमेलनाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कवी अशोक नायगांवकर यांनी जगण्याचे वास्तव मांडलेल्या ‘वेड लागायच्या आधी’ या कवितेने रसिकांची टाळ्यांची दाद मिळविली.

क.. कमळाचे तळे घेवून यायचा..
ख.. च अगदी खरं वाटतं राहायचा..
थ.. थुई थुई नाचत रहायचा.. मोरासारखा.. ही बाराखडीची कविता अशोक नायगांवकरांनी सादर करुन उपस्थित शाळकरी मुलांची मने जिंकली.

- Advertisement -

अस्मानिकनो हीच आहे निर्वाणीची वेळ
जात पात आणि उच्च नीच हा बंद करुया खेळ
हवे कशाला जात दाखले आणि जातीचे मूळ.. या आप्पा ठाकूर यांनी जाती-पातीतील भेदभावांवर आधारित कविता सादर करुन रसिकांची दाद मिळविली.
नशीबा तुझ्या हवाली.. करणार डाव नाही
मागे फिरावयाचा… माझा स्वभाव नाही.. गझलकार संदीप माळवी यांनी सादर केलेल्या गझलने उपस्थितांची वाहवा मिळविली.. तर त्यांनी ‘आई’ वर सादर केलेल्या कवितेने वातावरण भावूक झाले.

फुलांचा रंग घे रे तू..
नभाचा छंद हो रे तू..
कुणाचे दु:ख झेलावे…
कुणाची खंत घे रे तू…या कवी अशोक बागवे यांनी गाऊन सादर केलेल्या कवितेला रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.*भारीच नाद मला शब्‌द कुटायचा..
तशी नादानच म्हणा ना.
रोज ढीगभर शब्द गोळा करायचे
आणि एक एक कुटत बसायचे…ही कविता कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी सादर केली.
‘स्वातंत्र्याच्या अमृतसाली चला चेतवू पुन्हा मशाली.
नकोच जात आणि नकोच धर्म आपणच होवू आपले वाली..’ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरे करत असताना समाजातील घडामोडींवर भाष्य करीत वास्तवतेला स्पर्श करणारी कविता सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सादर करुन सत्य परिस्थिती मांडली.  तर मनोगत – मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाणाऱ्या मुलांचे* या कवितेतून गावखेड्यातील मुले मधल्या सुट्टीत शाळा सोडून त्यांच्यात सुरू असलेल्या गप्पांवर भाष्य करणारी कविता सादर कवी अशोक कोतवाल यांनी सादर केली आणि उपस्थित प्रेक्षकांना त्यांच्या शाळेच्या दिवसांची आठवण करुन दिली.
घरंदाज घरांच्या भिंतीनाही असतात म्हणे कान
म्हणूनच आपली गुपिते मनमोकळ्या रस्त्यांना सांगावीत
ती करत नाहीच कधीच प्रतारणा तुमच्याशी किंवा तुमच्या गुपितांशी…ही कविता जालन्याहून आलेल्या कवयित्री संजीवनी तलेवाडकर यांनी सादर केली.

पानगीक भेटलस.. अंगास खेटलस्..काळोखी लाट हातात हात घेतलस अकस्मात … झालो झिनझिनाट.. या कवी महेश केळुसकर यांच्या मालवणी बोलीभाषेतील कवितेने कविसंमेलनात वेगळेच रंग भरले..
पुरे झाले चंद्र सूर्य.. पुरे झाल्या तारा पुरे झाले नदीनाले.. पुरे झाला वारा… ही कुसुमाग्रजांची कविता कवी विजय चोरमारे यांनी सादर केली. तर कवी प्रशांत डिंगणकर यांनी सामाजिक-राजकीय विषयावर भाष्य करणारी *माझ्या मुलीचे प्रश्न ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -