महेश आहेर यांच्याविरुध्द मोक्काअंतर्गत कारवाई करा- शहर कॉंग्रेसची मागणी

 राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड  आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची सहायक आयुक्त महेश आहेर यांची कथीत आॅडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता शहर कॉंग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी महेश आहेर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आहेर यांच्या विरोधातील पुरावेच त्यांनी मंगळवारी शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी सांगितले की महेश आहेर यांच्यासाठी कशापध्दतीने विविध प्रभाग समितीमधील क्लार्क, शिपाई, काही खाजगी व्यक्ती पैसे गोळा करण्याचे काम करतात, त्यांचे फोटो आणि पुरावे त्यांनी सादर केले. तसेच त्यांची शैक्षणिक अहर्ता देखील खोटी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी आहेर यांच्या कार्यालयातील शिपाई आणि इतर काही सदस्य, नौपाडा, मुंब्रा, कळवा, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील लिपिक आणि काही शिपाई कशा पध्दतीने रोजच्या रोज आहेर यांच्यासाठी पैसे गोळा करतात. याचे पुरावे आणि त्यांचे फोटोही त्यांनी यावेळी सादर केले.अनधिकृत बांधकाम प्रकरणी यापूर्वीच त्यांच्यावर चौकशी लावण्यात आली असतांना देखील त्यांच्याकडेच या विभागाचा अतिरिक्त कार्यभार कसा सोपविण्यात आला? असा सवालही त्यांनी केला. त्यांची शैक्षणिक अहर्ता देखील १० असून सिक्कीम युनिर्व्हसीटीचे जे सर्टीफीकेट जोडण्यात आले आहे, ते देखील खोटे असल्याचा दावा चव्हाण यांनी यावेळी केला.एकाच विभागात कार्यरत असतांना त्या विभागातील विविध पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे,नियमानुसार सहा महिन्यांच्यावर असा कार्यभार देता येत नाही,मात्र नियम डावलून त्यांना कार्यभार देण्यात आला आहे.
त्यातही त्यांच्याकडी पदभार काढण्याचा आल्याची चर्चा असली तरी देखील या विभागातील माहिती अधिकार पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. ते पद भरण्यात आले असून आहेर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. अंपग नसलेल्यांना स्टॉलचे वाटप करण्यात आले असून एका स्टॉल पोटी दरमहा १० हजारांची वसुली आहेर यांचा माणुस नियमीतपणे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गावदेवी मंडई मध्ये एक गाळा जास्तीचा बांधून तो परस्पर विकण्याचे कामही करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी जो बीएसयुपी घोटाळा उघडकीस आणला होता. त्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सरकारच्या काळात देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही त्याची चौकशी झालेली नाही. याशिवाय काही ठिकाणी बेनावी मालमत्ता आहेत,चार आलीशान गाड्या आहेत.तर काही ठिकाणी स्वत:च्या नावावर फ्लॅट घेतलेले असल्याचे पुरावे देखील त्यांनी यावेळी सादर केले. दाऊदच्या गुंडाला ५० लाखांची रिव्हॉल्व्हर घेऊन देण्यातही त्यांचा हात असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. हे सर्व पुरावे पोलीस आणि पालिका आयुक्तांना दिले जाणार असून आहेर यांच्यावर मोक्कका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शहर ग्रेसच्या वतीने अॅड विक्रांत चव्हाण यानी केली आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे,अॅड बाळासाहेब भुजबळ व महिला अध्यक्षा वैशाली भोसले उपस्थित होते.