दोन लस घेतलेल्यांनाच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशातच शासनाकडून शासकीय कार्यालयांमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता,ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील एक परिपत्रक काढीत अत्यंत निकडीचे काम असल्यास व लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच एन्ट्री  दिली जाणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी येणाऱ्या नागरिकांनी दोन्ही डोसचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश दिला जात होता.

ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असतानाच डिसेंबर २०२१ मध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने आपले डोके वर काढले आहे. त्यात जरा विषाणूचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या विषाणूच्या संसर्गाच्या वेग पेक्षा अधिक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याची गांभीर्याने दाखल घेत, शासनाने कोविड-१९ विषाणुच्या बदललेल्या स्वरुपामुळे तिसरी लाट आल्याचे निदर्शनास आल्याने उपाययोजना बाबतची नियमावली जारी केली आहे.

ठाणे जिल्हयात तिसऱ्या लाटेमुळे होणाऱ्या प्रादुर्भावाने रुग्ण संख्येत वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील शासनाकडील प्राप्त सुचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणा-या अभ्यांगतानी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

यामध्ये मास्क लावणे, इतरांशी बोलताना नियमाप्रमाणे सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझारचा वापर करणे, लसीकरणाचे दोन डोस पुर्ण केलेल्या नागरिकांनाच कार्यालयात एन्ट्री देणे सुरू केले आहे. तसेच कामाशिवाय कार्यालयात येणा-या अभ्यांगताना प्रवेश नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता, लसीचे दोन डोस घेतले असले तर, जिल्हाधिकारी कार्यालयात एन्ट्री मिळणार आहे. असे परिपत्रक अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी काढले आहे.